Kolhapur: अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपातील आठ लाकडी खांबांच्या उभारणीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:03 IST2025-07-29T14:02:25+5:302025-07-29T14:03:35+5:30
पुरातत्वकडून अंबाबाई मंदिराची पुन्हा पाहणी

Kolhapur: अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपातील आठ लाकडी खांबांच्या उभारणीला सुरुवात
काेल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या आठ खांबांच्या उभारणीच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. मंदिर विकासाच्या पहिल्या टप्प्यातील आराखड्याच्या अंदाजपत्रकासाठी सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह पुरातत्व विभागाच्या पथकाने मंदिर आवारातील शिल्पांची पाहणी केली. या आठवड्यात अंदाजपत्रक तयार केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यानंतर पुरातत्व खात्याकडून मंदिरांतर्गत करण्यात येणाऱ्या जतन संवर्धनाच्या कामासाठी अंदाजपत्रक बनविले जात आहे. त्यासाठी मागील आठवड्यात पुरातत्वच्या एका टीमने मंदिर आवाराची पाहणी केली होती.
सोमवारीदेखील जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरातत्व सहसंचालक विलास वहाणे व टीमने मंदिरातील दुखावलेले शिल्प, सुटलेले दगड, गळती, दगडी बांधकामावरील बारीक नक्षीकाम, मंदिर प्रासादातील अन्य छोटी मंदिरे यांची पाहणी केली. पुढील काही दिवसांत सविस्तर अंदाजपत्रक देऊन जतन संवर्धनाच्या पुढील प्रक्रियेला प्रारंभ होईल. मंदिर परिसरातील गरुड मंडपाचे लाकडी खांब उभारण्याच्या कामालादेखील सोमवारी सुरुवात झाली. पहिल्यांदा आठ खांब उभारण्यात येत आहेत.