सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला

By विश्वास पाटील | Published: May 23, 2024 06:12 AM2024-05-23T06:12:15+5:302024-05-23T06:12:39+5:30

त्यांच्या पत्नी जयादेवी यांचे २०१२ मध्ये निधन झाले. तो आघात त्यांनी सहन केलाच परंतू कौटुंबिक अनेक धक्के सहन करत ते हिंमतीने उभे राहिले होते. सडोलीच्या जमादार घराण्याचा कणाच त्यांच्या निधनाने मोडला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही ते कणा होते.

Congress MLA PN Patil passed away  | सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला

सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा ढाण्या वाघ अशी प्रतिमा असलेले, काँग्रेसशी अतूट निष्ठा ठेवून आयुष्यभर वाटचाल केलेले आणि सामान्य कार्यंकर्त्याचा आधारवड बनलेले नेते आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी. एन. पाटील (PN Patil) (वय ७१ रा. मुळ गांव सडोली खालसा, ता.करवीर सध्या राहणार राजारामपुरी कोल्हापूर) यांचे गुरुवारी सकाळी सहा वाजता मेंदूत रक्तस्त्राव होवून आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांवर दू:खाचा डोंगरच कोसळला. कमालीचे पोरकेपण साऱ्यांनीच अचानकपणे अनुभवले. अनेक कार्यकर्ते ओक्साबोक्सी रडत होते. कुणी कुणाला सावरायचे अशी स्थिती निर्माण झाली. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, राहूल, विवाहित मुलगी टीना, बहिण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे.अंत्यविधी सडोली खालसा येथे ११ वाजता होणार आहे..

त्यांच्या पत्नी जयादेवी यांचे २०१२ मध्ये निधन झाले. तो आघात त्यांनी सहन केलाच परंतू कौटुंबिक अनेक धक्के सहन करत ते हिंमतीने उभे राहिले होते. सडोलीच्या जमादार घराण्याचा कणाच त्यांच्या निधनाने मोडला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही ते कणा होते.

आमदार पाटील हे प्रकृतीच्या बाबतीत कमालीचे दक्ष होते. परंतू लोकसभा निवडणूकीत तब्बल महिनाभर त्यांनी प्रचारासाठी रात्रीचा दिवस केला.  त्यामुळे मतदान झाल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. म्हणून आवश्यक सर्व तपासण्या करूनही घेतल्या. त्यामध्ये कांहीच दोष न आढळल्याने ते थोडे निवांत झाले. तसेही शनिवारीच घरी जावून शाहू छत्रपती यांनी त्यांना तुम्ही आजारपण अंगावर काढू नका, तातडीने रुग्णालयात दाखल व्हा असा आग्रह धरला होता. परंतू आता बरे वाटते आज/ उद्या जातो दवाखान्यात असे त्यांचे मत पडले. नियतीने तेवढाच डाव साधला आणि रविवारी सकाळी ब्रश करताना ते कोसळले. तेथूनच त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.

सत्तेसाठी वैचारिक भूमिकेला, पक्षीय निष्ठेला सोडचिठ्ठी देवून कोणत्याही पक्षाबरोबर घरोबा करण्याचे राजकारण रुढ झाले असताना आमदार पाटील यांनी एकदा घेतलेला काँग्रेसचा तिरंगा ध्वज कधीच खाली ठेवला नाही. उभ्या आयुष्यात त्यांनी कधीच पक्षाशी गद्दारी केली नाही. त्यांचे राजकारण हे फक्त सत्तेसाठी हपापलेले नव्हते. त्याला रचनात्मक कार्याची मोठी जोड होती. त्या कार्याला पूरक म्हणून ते राजकारण करत राहिले. त्यामुळेच त्यांनी आमदार होण्याच्या अगोदर दिंडनेर्लीच्या फोंड्या माळावर राजीवजी सूत गिरणीची उभारणी हिंमतीने केली. निवृत्ती तालुका संघ नावांरुपाला आणला. श्रीपतरावदादा बँक स्थापन करून ती उत्तम पध्दतीने चालवून दाखवली. सुरु केलेली कोणतीच संस्था अडचणीत आली म्हणून बंद करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नाही. करवीरच्या जनतेने त्यांना २००४ आणि २०१९ असे दोनवेळा आमदार केले. आताही विधानसभेचे ते तगडे उमेदवार होते. राज्यात १९९९ ला काँग्रेस दुभंगल्यावर ते मुळ काँग्रेससोबतच राहिले. अडचणीच्या काळात त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि तब्बल १८ वर्षे काँग्रेसची संघटनात्मक बांधणी केली.

पराभवाच्या छाताडावर राहिले उभे -
आमदार पाटील यांनी विधानसभेच्या १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा सहा निवडणूका लढवल्या. पहिल्या १९९५ च्या लढतीत ते शेकापचे संपतराव पवार यांच्याकडून ३३०२ मतांनी, त्यांच्याकडूनच १९९९ च्या निवडणूकीत ते ८,६०५ मतांनी पराभूत झाले. परंतू त्याचा वचपा आमदार पाटील यांनी २००४ मध्ये काढला. पवार यांचा तब्बल ४४ हजार ९९७ मतांनी पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले. पुढे २००९ ला त्यांची लढत शिवसेनेच्या चंद्रदिप नरके यांच्याशी झाली. या निवडणूकीत नरके ५६२४ मतांनी विजयी झाले. पुढच्या २०१४ च्या निवडणूकीत नरके यांच्याकडूनच आमदार पाटील यांचा अवघ्या ७१० मतांनी निसटता पराभव झाला. परंतू गेल्या निवडणूकीत आमदार पाटील २२,६६१ मतांनी विजय खेचून आणला. पराभवाने ते कधी खचले नाहीत. नवी जिद्दीने मैदानात उभे राहिले.

मंत्रीपदाचे स्वप्न अधुरेच... -
आमदार पाटील हे २००४ ला पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांचे जीवश्य कंठस्य मित्र विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते. परंतू तेव्हा आमदार पाटील पहिल्यांदाच आमदार झाल्याने त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. तेव्हा त्यांना वीज मंडळाचे संचालकपद मिळाले. गेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीची सत्ता आली होती. तेव्हा त्यांना मंत्रीपदाची आशा होती. मात्र ते मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. 
 

Web Title: Congress MLA PN Patil passed away 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.