शिक्षकांसमोर मराठी शाळा टिकविण्याचे आव्हान

By Admin | Updated: September 6, 2015 00:44 IST2015-09-06T00:44:19+5:302015-09-06T00:44:19+5:30

हसन मुश्रीफ : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांचा गौरव

Challenge of maintaining Marathi schools before teachers | शिक्षकांसमोर मराठी शाळा टिकविण्याचे आव्हान

शिक्षकांसमोर मराठी शाळा टिकविण्याचे आव्हान

कोल्हापूर : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे महत्त्व वाढविले जात असतानाच मराठी शाळांचे अस्तित्व राखण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी सकाळी येथे बोलताना केले. शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाने जादा निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पंधरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शनिवारी शिक्षकदिनाचे औचित्य साधून विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी आमदार मुश्रीफ बोलत होते. कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा पार पडला.
महापालिकेच्या मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला पाहिजे. तेथे चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले गेले पाहिजे, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. प्रशासनाने शहरातील रस्ते, गटारी, ड्रेनेज यासारख्या नागरी सुविधांवर जसा निधी खर्च केला जातो, तसाच तो महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही खर्च करण्याची भूमिका घ्यावी, अशी सूचना मांडली.
राज्य सरकारकडून आलेल्या वीस कोटींच्या निधीतून दोन कोटींचा निधी हा प्राथमिक शिक्षण मंडळाला द्यावा, अशी सूचना माजी मंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केली. ते म्हणाले, गेल्या पाच-सात वर्षांत आम्ही महापालिकेच्या शाळांना निधी देण्याचा प्रयत्न केला. सर्व शिक्षा अभियानातून १५० खोल्या बांधल्या. सर्व शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून दिले. याहीपुढे जाऊन या शाळांना मदत करण्याची आवश्यकता आहे. महापौरांनी राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीतील दोन कोटी रुपये शाळांसाठी द्यावेत.
शिक्षण मंडळाचे उपसभापती भरत रसाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी शिक्षण मंडळाकडील सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
सभापती महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दरवर्षी आपण केवळ शिक्षकांना पुरस्कार देत होतो. यंदाच्या वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत शिक्षक, शिक्षण मंडळ सदस्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यश म्हणून महापालिकेच्या शाळांकडील विद्यार्थी पटसंख्या वाढली आहे, असे जाधव यांनी सांगितले.
यावेळी महापौर वैशाली डकरे यांच्यासह समीर घोरपडे, अशोक पोवार, गौरवमूर्तींपैकी महेश ठोंबरे यांचीही भाषणे झाली. प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपमहापौर ज्योत्स्ना पवार-मेढे, गटनेते राजेश लाटकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती लीला धुमाळ, परिवहन सभापती अजित पोवार यांच्यासह शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Challenge of maintaining Marathi schools before teachers