Kolhapur Crime: ..अन् भावजयीनेच काढला दिराचा काटा; जोतिबा डोंगरावरील खुनाचा छडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 12:50 IST2025-04-22T12:47:51+5:302025-04-22T12:50:14+5:30
दारू पाजली, हात-पाय बांधले अन् गळा आवळून केला खून

Kolhapur Crime: ..अन् भावजयीनेच काढला दिराचा काटा; जोतिबा डोंगरावरील खुनाचा छडा
कोडोली : जोतिबा डोंगरावर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवत खून प्रकरणाचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. अनैतिक संबंधातून भावजयीने प्रियकराच्या मदतीने दीराचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव आप्पासो शंकर बोरगावे (वय ४५, रा. मोळे, ता. कागवाड, जि. बेळगाव) असे नाव आहे.
याप्रकरणी मुख्य संशयित गौडप्पा आनंद शिंदे (वय ३३, रा. कात्राळ, ता. कागवाड) व गाडी मालक राजू भिमाप्पा हुलागटी (रा. देसाईवाडी, ता. अथणी, जि. बेळगाव) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
१२० ते १३० सीसीटीव्ही फुटेज तपासले
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जोतिबा डोंगरावर शनिवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली होती. मृत व्यक्ती जवळ कोणताही ठोस पुरावा नसतानाही या खुनाचा छडा लावणे पोलिसांच्या समोर आव्हान होते. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ३ पथके करत जिल्ह्यातील १२० ते १३० सीसीटीव्ही फुटेज तपासले.
गाडी मालकाने खुनाची कबुली देत सर्व हकीकत सांगितली
गुन्ह्यातील मृतदेह चारचाकी गाडीतून जोतिबा डोंगरावर आणलेचे निष्पन्न केले. गाडीचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेत असताना, पथकास जयसिंगपूर येथे या गाडीचा नंबर दिसून आला. ही गाडी अथणी येथील राजू हुलागटी यांची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथक तत्काळ अथणी येथे दाखल झाले. पथकाने गाडी मालक राजू हुलागटी यास ताब्यात घेऊन सखोल माहिती घेतली असता, त्याने खुनाची कबुली देत घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली.
मारहाण अन् शिवीगाळ करीत असल्याचा मनात राग
मृत आप्पासो बोरगावे याच्या भावाचे ८ वर्षांपूर्वी निधन झाले होते. भावाच्या मृत्यूनंतर भावाच्या पत्नीशी आप्पासो याचे अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे व आप्पा याच्या भावजचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. भावजचे इतर पुरुषाशी प्रेम संबध झाल्याच्या कारणावरून आप्पासो हा भावजय मारहाण करून शिवीगाळ करीत होता. याचा राग मनात धरून भावजयने गौडप्पा शिंदे यास फोन करून आप्पा यास संपवावे, असे सांगितले.
दारू पाजली, हात-पाय बांधले अन् गळा आवळून खून
आरोपी गौडाप्पा शिंदे याने गाडी मालक याच्याशी संगनमत करून १८ एप्रिल रोजी उगार कर्नाटक येथील हॉटेलवर मृत आप्पा यास दारू पाजली. त्यानंतर आप्पास चारचाकी गाडीतून दि. १९ एप्रिल रोजी पहाटे २.०० वाजताच्या सुमारास जोतिबा ते गिरोली जाणारे रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरावर हात-पाय बांधून आणले. तसेच, त्या ठिकाणी त्याचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.