‘ब्रिस्क’ कंपनी तीन हप्त्यांत ग्रॅच्युइटी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:51 IST2021-02-05T06:51:38+5:302021-02-05T06:51:38+5:30
गडहिंग्लज : ‘ब्रिस्क’ फॅसिलिटीज प्रा. लि., कंपनीच्या कार्यकाळात २९१ कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची एकूण ग्रॅच्युइटी ९८ लाख ४७ ...

‘ब्रिस्क’ कंपनी तीन हप्त्यांत ग्रॅच्युइटी देणार
गडहिंग्लज : ‘ब्रिस्क’ फॅसिलिटीज प्रा. लि., कंपनीच्या कार्यकाळात २९१ कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची एकूण ग्रॅच्युइटी ९८ लाख ४७ हजार रुपये असून ती तीन समान हप्त्यांत अदा करणार आहोत, अशी माहिती कंपनीचे सरव्यवस्थापक वसंत गुजर यांनी पत्राद्वारे दिली आहे.
हरळी येथील अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना सहयोग तत्त्वावर ब्रिस्क कंपनीकडे चालवायला देण्यात आला आहे. या कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी थकीत फायनल पेमेंट, ग्रॅच्युइटी व वेतन फरकाची रक्कम मिळावी म्हणून येथील प्रांतकचेरीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
कंपनीच्या कार्यकाळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यास ‘ब्रिस्क’ने सहमती दर्शवली होती. उच्च न्यायालयात प्रलंबित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देणीसंदर्भातील वादाच्या निर्णयाशी अधीन राहून कंपनीने ग्रॅच्युइटी देण्याचा निर्णय घेतला आहे.
५ फेब्रुवारी, ५ एप्रिल व ५ जून २०२१ याप्रमाणे ग्रॅच्युइटीची रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल, अशा आशयाचे पत्र कंपनीने कारखाना व आंदोलक कामगारांना दिले आहे.
दरम्यान, सेवानिवृत्त कामगारांनी आज (मंगळवारी) २० व्या दिवशीही धरणे आंदोलन केले. केवळ ग्रॅच्युइटी देण्याचा निर्णय मान्य नसल्यामुळे संतप्त कामगारांनी आंदोलनस्थळी कंपनीचे पत्र फाडून टाकले.