बिद्री साखर कारखान्याने दूषित पाणी रोखावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:55+5:302021-02-05T06:52:55+5:30

सरवडे : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत मिसळल्याने नदीकाठावरील नागरिकांचे ...

Bidri Sugar Factory should prevent contaminated water | बिद्री साखर कारखान्याने दूषित पाणी रोखावे

बिद्री साखर कारखान्याने दूषित पाणी रोखावे

सरवडे : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत मिसळल्याने नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील शेकडो गावांतील हजारो नागरिक आजारी पडले आहेत. याबाबत प्रशासनाला यापूर्वी निवेदन दिले होते. पण कारखाना प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही. यामुळे बिद्री परिसरातील सरपंच व पदाधिकारी संघटनेने शुक्रवारी पुन्हा कारखान्याच्या प्रशासनाला निवेदन दिले व दूषित पाणी लवकरात लवकर रोखले नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा नदीकाठच्या गावांतील लोकांनी दिला.

याबाबत माहिती अशी, गेल्या पंधरा दिवसांपासून बिद्री साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात येते. मळी नदीत मिसळल्याने नदीकाठावरील जवळजवळ पन्नास ते साठ गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील शेकडो गावांतील हजारो नागरिक गॅस्ट्रोने आजारी पडलेत. पाण्याला सुटलेल्या दुर्गंधीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिद्री, वाळवे खुर्द, कसबा वाळवा, कासारवाडा, चंद्रे, चांदेकरवाडी, पालकरवाडी, सोनाळी, बेळवळे खुर्द, बेलवळे बु., केबळी, बाचणी, पालकरवाडी आदी प्रमुख गावांतील शेकडो नागरिक यामुळे आजारी पडलेत. यामुळे कारखान्याने नदीत मिसळणारे दूषित पाणी रोखावे, या मागणीसाठी दूधगंगा नदीकाठावरील शेकडो प्रमुख लोकप्रतिनिधींनी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांना जाब विचारला. यापुढे नदीतील दूषित पाणी रोखले नाही, तर कारखाना बंद पाडण्याचा इशारा बिद्री नदीकाठावरील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिला.

यावेळी शिष्टमंडळाचे प्रमुख संभाजी ब्रिगेडचे विभागप्रमुख बाळासाहेब पाटील म्हणाले, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बगॅस व कार्बनमुळे बिद्री परिसरात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे.

संचालक आर. डी. देसाई म्हणाले, नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याबाबत गंभीर दखल घेतली जाईल.

या शिष्टमंडळात बाळासाहेब पाटील, पं. स. सदस्य जयदीप पोवार, पोपटराव ढवण, सचिन आबदार, सिकंदर मुल्लानी, रमेश घारे, बापूसाहेब किल्लेदार. विक्रम घारे, नारायण पाटील, डॉ. प्रदीप पाटील, सुजित खामकर, श्रीकांत पाटील, दिगंबर पाटील, शंकर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ..

.

फोटो

बिद्रीस दूषित पाण्यासंदर्भाचे निवेदन कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांना देताना बाळासाहेब पाटील, सचिन आबदार.

Web Title: Bidri Sugar Factory should prevent contaminated water