गडावर गैरवर्तन केल्याच्या कारणावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:45+5:302021-02-05T06:54:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : रांगणा किल्ल्यावर नशा केल्याच्या कारणावरून गारगोटी येथील युवकास मारहाण करून त्याची मोबाईलवर क्लिप ...

Beaten for misconduct at the fort | गडावर गैरवर्तन केल्याच्या कारणावरून मारहाण

गडावर गैरवर्तन केल्याच्या कारणावरून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी : रांगणा किल्ल्यावर नशा केल्याच्या कारणावरून गारगोटी येथील युवकास मारहाण करून त्याची मोबाईलवर क्लिप काढणाऱ्या त्या चौघाजणांना गारगोटी येथील नागरिकांनी पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी चौघाजणांवर भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भुदरगड पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. ॠषिकेश भरत माने, प्रसाद शिवाजी माने (दोघे रा. कोगनुळी), उमेश राजाराम माने (रा. वडणगे), विजय नामदेव गुरव (रा. शिरगाव ) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद ओंकार श्रीकांत जाधव (सुदर्शननगर ,गारगोटी) यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे.

अधिक माहिती अशी, २६ जानेवारी रोजी रांगणा किल्ला येथे फिरण्यासाठी गेलेल्या गारगोटीतील एका युवकाला तंबाखू खाल्ल्याच्या कारणावरून कोगनुळी येथील चार तरुणांनी माफी मागण्यास सांगून जमिनीवर नाक घासावयास लावले. माफी मागावयास खाली वाकल्यानंतर त्या युवकाला लाथाबुक्क्यांनी तसेच झाडाच्या फांदीने निर्दयीपणे मारहाण करण्यात आली होती. यावेळी त्याच्या डाव्या हाताचे हाड मोडले, डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच मारहाणीचे मोबाईलवरून शूटिंग करून व्हायरल करून स्टंटबाजी करण्यात आली. युवकास निर्दयीपणे मारहाण केल्याची बातमी गारगोटी शहरात सर्वत्र पसरली. तसेच मारहाणीचे शूटिंग पाहून संतप्त झालेले गावकरी, तरुण मारहाण करणाऱ्या त्या चौघांची वाट पहात बसले होते. मारहाण करणारे हे चारजण मंगळवारी रात्री आपल्या गावी परत जात असताना त्यांना वाटेत अडवून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अशाप्रकारे समाजरक्षकाच्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी तरुणांनी केली आहे.

Web Title: Beaten for misconduct at the fort