वडगावात शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:19+5:302021-02-05T06:53:19+5:30

पेठवडगाव : भगवे ध्वज, ओसंडून वाहणारा उत्साह, मनामनांत जागलेले शिवप्रेम अशा जल्लोषी वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ...

Arrival of a grand statue of Lord Shiva at Wadgaon | वडगावात शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे आगमन

वडगावात शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे आगमन

पेठवडगाव : भगवे ध्वज, ओसंडून वाहणारा उत्साह, मनामनांत जागलेले शिवप्रेम अशा जल्लोषी वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे वडगावात गुरुवारी आगमन झाले. लोकसहभागातून शहरातील प्रमुख मार्गावरून फेरीने वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. हा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकात बसविण्यात आला आहे. लवकरच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यानंतर या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

महालक्ष्मी मंदिर येथे आमदार राजू आवळे यांच्या हस्ते खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, गटनेत्या प्रविता सालपे, अजय थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचे पूजन झाले.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवाजी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांच्या हातातील भगवे ध्वज हवेत फिरवत ही मिरवणूक पुढे सरकली. शहरातील प्रमुख मार्गांवरून पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी चौकात पुतळ्याचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांबरोबर सहभागी कार्यकर्त्यांनी भगवे फेटे, महिलांनी भगव्या साड्या-फेटे परिधान करून सहभागी झाले होते. शोभायात्रा मार्गावर रांगोळ्या, पुष्पवृष्टी, भगवे ध्वज, पायघड्या, चौकाचौकांत स्वागत कक्ष उभे केले होते.

यावेळी संदीप पाटील, शरद पाटील, संतोष गाताडे, गुरुप्रसाद यादव, अलका गुरव, नम्रता ताईंगडे, मैमुन कवठेकर, शबनम मोमीन, सुमती माळी, सुनीता पोळ, आदी प्रमुख उपस्थित होते. --

चौकट - अशी आहे मूर्ती

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा ब्राँझ धातूचा आकर्षक आहे. त्याची उंची बारा फूट, तर चबुतऱ्याची उंची अकरा फूट राहणार आहे. मूर्तीचे वजन दोन हजार आठशे किलो आहे. मूर्ती सात महिन्यांत तयार करण्यात आली आहे. शिरोली येथील संतोष चौगुले यांनी मूर्ती बनवली.

फोटो ओळ - पेठवडगाव येथे पद्मारोडवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची थाटात काढलेली मिरवणूक. (छाया - संतोष माळवदकर)

Web Title: Arrival of a grand statue of Lord Shiva at Wadgaon