कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेत संपविले जीवन, एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबीयांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:27 IST2025-10-06T12:26:14+5:302025-10-06T12:27:49+5:30
कारणाचा शोध सुरू

कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेत संपविले जीवन, एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबीयांना धक्का
कोल्हापूर : इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारा गौरव नितीन सरनाईक (वय १९, रा. जरगनगर, कोल्हापूर) याने राहत्या घरी छताच्या हुकाला बेडशीटने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि. ५) सकाळी पावणे नऊच्या सुमारास निदर्शनास आला. वडिलांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, गौरव हा सरनाईक दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याने दहावीत ९५ टक्के, तर बारावीत ७५ टक्के गुण मिळविले होते. जेईईमध्ये चांगले गुण मिळवून त्याने शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्याचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. रविवारी सकाळी त्याने बेडरूममध्ये छताच्या हुकाला बेडशीटने गळफास लावून घेतल्याचे आई-वडिलांनी पाहिले. तातडीने गळफास सोडवून त्यांनी मुलाला खासगी वाहनातून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सगळे सुरळीत सुरू असताना एकुलत्या एक मुलाने टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपविल्याने आई-वडिलांना धक्का बसला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. त्याच्या मोबाइलची तपासणी करून आणि मित्रांशी बोलून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.