कोल्हापुरातील तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे अडले घोडे; सल्लागार नियुक्ती, सेवावाहिन्यांच्या खर्चाचे कोडे
By भारत चव्हाण | Updated: May 14, 2026 14:43 IST2026-05-14T14:42:34+5:302026-05-14T14:43:03+5:30
शहरात वाहतुकीची कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून या उड्डाणपुलाचा पर्याय समोर आला.

कोल्हापुरातील तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे अडले घोडे; सल्लागार नियुक्ती, सेवावाहिन्यांच्या खर्चाचे कोडे
भारत चव्हाण
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाढलेल्या वाहतुकीवरील भार कमी करण्याकरिता तावडे हॉटेल ते शिवाजी पूल मार्गावर उड्डाणपूल उभारण्यास तत्वत: मान्यता झाली असली तरी पुढील कोणतीच प्रक्रिया झाली नसल्याने सध्या तरी हा उड्डाणपूल ‘हवेत’च आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा उड्डाणपूल केला जाणार आहे, मात्र त्याच्या सल्लागाराचे शुल्क तसेच सेवावाहिन्या स्थलांतराचा गुंताही अजून सुटलेला नाही.
दोन वर्षे त्यावर केवळ चर्चाच सुरु आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने सल्लागार नेमावा, अशी सूचना केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडून आली असली तरी त्याचे शुल्क कोणी द्यायचे आणि उड्डाणपूल उभारत असताना सेवावाहिन्या स्थलांतराचा खर्च कोणी करायचा हे मुद्दे अनुत्तरित राहिले आहेत.
खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू छत्रपती, आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापुरातील या उड्डाणपुलासाठी आग्रह धरला. त्यासंदर्भात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यापूर्वी बैठकाही झाल्या आहेत. नुसतीच तत्त्वत: मान्यता झाली असली तरी पुढच्या प्रक्रिया जलदगतीने झाल्या तरच कामाला सुरवात होऊ शकणार आहे. परंतु येथे सल्लागार नेमण्यावरच घोडे अडले आहे.
कोल्हापूर शहर दक्षिण भारताला तसेच कोकणाला जोडणारे एक प्रमुख केंद्र आहे. कोल्हापूरहून खाली कोकणात जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोल्हापुरातून बाह्यवळण रस्ता नसल्यामुळे रोज हजारो वाहने तावडे हॉटेल, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक ते शिवाजी पूल या मार्गावरून कोकणात जातात, त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून या उड्डाणपुलाचा पर्याय समोर आला.
खासदार शाहू छत्रपती यांनी या उड्डाणपुलाला जोडूनच दाभोळकर कॉर्नर ते पाच बंगला असा एक जोड उड्डाणपूल करावा, अशी मागणी केली आहे. परंतु त्याबाबतही अद्याप काही निर्णय झालेला नाही.
या संदर्भात आमदार अमल महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. परंतु महानगरपालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत सल्लागार नियुक्तीचा निर्णय झाला की कामाला सुरुवात होईल, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
सल्लागार नेमल्यानंतर आराखडे
या कामासाठी एकदा सल्लागार नियुक्त केला की मग उड्डाणपुलाचे डिझाइन, त्याच्या खर्चाचे आराखडे निश्चित केला जाणार आहेत. या प्रक्रियेला जेवढा विलंब होईल, तितका विलंब उड्डाणपुलाच्या कामास होणार आहे. म्हणूनच हे काम शक्य तितक्या लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा कोल्हापूरकर करताना दिसत आहेत.