धन्वंतरी पतसंंस्थेवर प्रशासक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:38+5:302021-02-05T06:57:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या धन्वंतरी सेवक सहकारी संस्थेतील अंतर्गत राजकारण उफाळून आले ...

Administrator will come to Dhanvantari Patsanstha | धन्वंतरी पतसंंस्थेवर प्रशासक येणार

धन्वंतरी पतसंंस्थेवर प्रशासक येणार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या धन्वंतरी सेवक सहकारी संस्थेतील अंतर्गत राजकारण उफाळून आले आहे. संस्थेचे सात संचालक अपात्र ठरल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले आहे. त्यामुळे संस्थेवर प्रशासक का नेमू नये, अशी नोटीस जिल्हा उपनिबंधकांनी बजावली आहे.

‘धन्वंतरी’ पतसंस्थेची २०१५ला निवडणूक होऊन अकराजणांचे संचालक मंडळ कार्यरत झाले. फेब्रुवारी २०२०मध्ये संस्थेत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आणि त्यातूनच तत्कालिन अध्यक्ष अरूण मेथे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. त्यामुळे मेथे यांनी अध्यक्षपदासह संचालक मंडळाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ डॉ. बरगे यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर बी. डी. चौगुले यांची अध्यक्ष म्हणून वर्णी लागली खरी, मात्र संघटनात्मक अस्वस्थता वाढत जाऊन थकबाकी व संचालक मंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याबाबत सात संचालकांविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी दाखल झाल्या. त्यानुसार सात संचालकांना अपात्र ठरविण्यात आले. दोघांनी राजीनामा दिल्याने मूळ नऊपैकी सात संचालक अपात्र ठरल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले. त्यामुळे संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती का करू नये? अशी नोटीस जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी संस्थेला बजावली आहे.

सहनिबंधकांकडे अपील

जिल्हा उपनिबंधकांनी बजावलेल्या प्रशासक नियुक्तीच्या नोटीसविरोधात अपात्र सात संचालकांनी विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांच्याकडे दाद मागितली आहे. मात्र, असे असले तरी प्रशासकाची नियुक्ती अटळ आहे.

कोट-

संस्थेत पारदर्शक कारभार करून प्रगतीपथावर नेली. मात्र, काही मंडळींना अध्यक्ष व्हायची आस लागल्याने त्यांनी राजकारण सुरू केले. त्यामुळेच मी राजीनामा देऊन बाहेर पडलो. पुढील कारवाई ही कायद्यानेच झाली आहे.

- अरूण मेथे (माजी अध्यक्ष, धन्वंतरी पतसंस्था)

दृष्टीक्षेपात ‘धन्वंतरी’

सभासद- १,२१७

ठेवी - ३० कोटी

कर्जे - २२ कोटी

नफा - १.३८ कोटी

Web Title: Administrator will come to Dhanvantari Patsanstha