लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहापूर, गावभाग, शिवाजीनगर व पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने शहरात पंधरा ठिकाणी ओपन बार, टवाळखोर, अवैध मद्यविक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये तीसजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तीन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. २५) रात्री करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी गावभाग, शिवाजीनगर व शहापूर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये शहरातील सर्व प्रकारची संघटित गुन्हेगारी, गांजा, गुटखा विक्री, अवैध धंदे, ओपन बार, टवाळखोर व खासगी सावकारी यांच्यावर कारवाई करून विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस उपअधीक्षक महामुनी यांच्या पथकाने अवैध मद्यविक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गावभाग व शहापूर पोलिसांनी सुमारे एक लाख रुपयांचा मुद्दमोल जप्त करून टोळीने फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई केली.