Kolhapur Crime: पगार देत नसल्याच्या कारणावरून कामगाराचा मालकावर धारदार शस्त्राने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:29 IST2026-01-03T18:27:59+5:302026-01-03T18:29:20+5:30
शिवाजीनगर पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले

संग्रहित छाया
इचलकरंजी : येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एका पे ॲण्ड पार्क वाहन तळाच्या मालकावर थकीत पगार देत नसल्याच्या कारणावरून कामगारानेच धारदार शस्त्राने हल्ला केला. गजानन बापू मुदगल (वय ४५, रा. विक्रमनगर) असे जखमी मालकाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गजानन मुदगल यांचे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पे ॲण्ड पार्क वाहन तळ आहे. त्यांच्याकडे एक मुलगा काम करीत होता. तो ८ डिसेंबर २०२५ ला काम सोडून गेला. त्याचा एक महिन्याचा पगार मुदगल यांच्याकडे थकीत होता. याबाबत विचारणा केली असता मुदगल यांनी १५ जानेवारीला पगार देतो, असे त्याला सांगितले होते;
परंतु पगार मिळत नसल्याच्या रागातून संबंधित कामगार मुलाने एका साथीदारासोबत वाहन तळाच्या ठिकाणी झोपलेल्या मुदगल यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या डोक्यात आणि तोंडावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.