Kolhapur Crime: विद्यार्थिनींची छेड, शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी हजारोंचा जमाव जमला.. पोलिसांमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:09 IST2025-07-02T16:08:53+5:302025-07-02T16:09:16+5:30

शिक्षकावर गुन्हा दाखल तर संबंधित संस्थेने शिक्षकाला केले बडतर्फ

A teacher was brutally beaten up by parents and a mob for molesting female students and using obscene words in Senapati Kapshi Kolhapur district | Kolhapur Crime: विद्यार्थिनींची छेड, शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी हजारोंचा जमाव जमला.. पोलिसांमुळे अनर्थ टळला

Kolhapur Crime: विद्यार्थिनींची छेड, शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी हजारोंचा जमाव जमला.. पोलिसांमुळे अनर्थ टळला

सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्यातील नामांकित विद्यालयातील सहायक शिक्षक निसार अहमद मोहिद्दीन मुल्ला (वय ५४) यास मुलींची वारंवार छेडछाड व अश्लील शब्द वापरल्याप्रकरणी पालक व जमावाने बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर पोलिसांनी मुल्ला याला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, शिक्षण संस्थेने मुल्ला याला सेवेतून बडतर्फ केल्याचे निवेदन संतप्त जमावासमोर वाचून दाखवले. यानंतर जमाव शांत झाला.

याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील विद्यालयामध्ये निसार मुल्ला हा गणिताचा शिक्षक म्हणून कार्यरत होता. चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून संबंधित शिक्षकाच्या असभ्य वर्तनाबाबत मुलींनी पालकांकडे तक्रार केली होती. वारंवार मुलींनी या शिक्षकाची घरी तक्रार केल्याने पालकांनी याचा जाब विचारण्यासाठी थेट शाळेत धाव घेतली.

मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळा सुरू होताच पालकांनी शाळेत जाऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला. यावेळी मुल्ला यांनी पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संतप्त पालकांनी मुल्ला यास शाळेच्या कार्यालयातून थेट बाहेर आणत बेदम चोप दिला. ही घटना समजताच प्रचंड मोठा तरुणांचा जमाव शाळेच्या आवारात जमला होता.

या घटनेची याबाबत मुरगुड पोलिसांना माहिती मिळताच ताबडतोब सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. येथील जमावाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कोल्हापूरहून जादा पोलिस कुमक मागवून घेतली. संबंधित शिक्षकाला मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी संतप्त तरुणांनी मुल्ला याला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिस गाडी अडवली. पोलिस व जमावामध्ये शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन केले.

संतप्त झालेल्या जमावाने संस्थेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना ताबडतोब कापशीत येण्यास सांगितले. पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येण्यास विलंब केल्याने जमाव पुन्हा आक्रमक झाला. दोनच्या सुमारास वरिष्ठ लिपिक वाघमोडे हे घटनास्थळी आले व त्यांनी निसार अहमद मुल्ला यास संस्थेतून बडतर्फ केल्याचे जमावासमोर निवेदन केल्यानंतर संतप्त झालेला जमाव थोडा निवळला.

विकृत मनोवृत्ती

यापूर्वी एका विद्यालयातही मुल्ला याने मुलींची छेडछाड काढण्याचा प्रकार केला होता. त्यावेळीसुद्धा तेथील पालक व जमावाने बेदम चोप देऊन शहरातून धिंड काढली होती. तरी देखील या विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने कोणताही धडा न घेता पुन्हा तोच प्रकार पुढे सुरू ठेवला. त्यामुळे पालकांतून मोठा उद्रेक झाला.

कठोर कायदेशीर कारवाई करणार : पवार

निसार मुल्ला यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुल्ला याच्या संदर्भात तक्रारी असतील तर पालकांनी पुढे यावे. मुल्ला याच्यावर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पवार यांनी सांगितले.

नराधमावर कडक कारवाई करा : मुश्रीफ

दरम्यान, या घटनेची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मंत्रालयात कामकाजात असताना मिळाली. त्यांनी ताबडतोब पोलिस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार यांना फोन करून त्या संबंधित नराधम शिक्षकास तत्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत.

सहायक शिक्षक मुल्ला याने मुलींना अपशब्द वापरले व छेडछाड करण्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात संस्थेने गंभीर दखल घेऊन मुल्ला यास बडतर्फ केले आहे. पोलिसही त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करतील. - मुख्याध्यापक

Web Title: A teacher was brutally beaten up by parents and a mob for molesting female students and using obscene words in Senapati Kapshi Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.