Kolhapur: उसाचा वजनकाटा तपासणीचे दीड कोटींची हायड्रोलिक क्रेन गेली गंजून, काटामारी चव्हाट्यावर तरी दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:46 IST2025-10-09T18:45:07+5:302025-10-09T18:46:33+5:30
नवीन हंगाम तोंडावर

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी नुकतेच साखर कारखान्यांत काटा मारणाऱ्यांना सोडणार नाही, अशी घोषणा केली असली तरी कारखान्यात होणारी काटामारी रोखण्यासाठी वजन काटे तपासण्यासाठी शासनाकडून दहा वर्षापूर्वी मिळालेले हायड्रोलिक क्रेन वापराविना गंजून गेले आहे. येथील गोकुळ कार्यालयाच्या आवारात ते सडत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही साखर कारखान्यांंकडून होणाऱ्या काटामारीसंबंधी जाहीर वक्तव्य केल्यानंतर काटा तपासणीच्या या यंत्राचा विषय समोर आला आहे. ऊस गाळपाचा नवीन हंगाम तोंडावर आला आहे. तरीही यंत्र वापरासंबंधी वैधमापन विभाग काहीही हालचाली करीत नसल्याच्या तक्रारी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि ऊस उत्पादक शेतकरी संघटनांकडून होत आहे.
साखर कारखान्यांकडून काटामारी करून मापात पाप होऊ नये यासाठी त्यांच्या तपासणीसाठी सन २०१४ मध्ये शासनाकडून जिल्ह्यासाठी दीड कोटी रुपयांचे हायड्रोलिक क्रेन वैधमापन विभागाकडे पाठवले. या विभागाच्या कार्यालय आवारात हे यंत्र लावण्यासाठी जागा नसल्याने गोकुळ कार्यालय परिसरात पार्क केले आहे. काटा तपासणीसाठी यंत्र वापरले नसल्याने पावसाळ्यात त्यावर गवत उगवते. यंत्र उघड्यावर पार्क केल्याने गंजले आहे. त्यावर प्रचंड प्रमाणात झाडांची पाने, कचरा साचली आहेत. वर्षापूर्वी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आंदोलन करून याकडे लक्ष वेधले होते. तरीही वैधमापन प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे आरोप होत आहेत.
गोकुळ प्रशासनाकडून वेळोवेळी पत्र, प्रतिसाद नाही..
ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालय परिसरात यंत्र पार्क केले आहे. यंत्र येथून घेऊन जावे, असे पत्र गोकुळ प्रशासनाने वेळोवेळी वैधमापन प्रशासनास दिले आहे. तरीही यंत्र घेऊन जाण्याची आणि वापरण्याची तसदी घेतली नसल्याने ते गंजून जात आहे.
मोबाइलवर ‘नो रिप्लाय’
वैधमापन विभागाचे अधिकारी दत्तात्रय पवार यांच्याकडून यंत्रासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल रिसिव्ह केला नाही. यामुळे यंत्र वापराविना एकाच ठिकाणी त्यांनी का थांबवून ठेवले आहे, याची अधिकृत माहिती त्यांच्याकडून मिळू शकली नाही.
दहा वर्षापासून यंत्र चालवण्यासाठी चालक नाही, असे वैधमापन विभागाचे अधिकारी सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात वैधमापन अधिकारी आणि कारखानदार यांचे साटेलोट असल्याने नवीन यंत्र सडवले आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे. - रूपेश पाटील, अध्यक्ष, स्वाभिमानी संभाजी ब्रिग्रेड, कोल्हापूर.
हायड्रोलिक क्रेन सन २०१४ मध्ये मिळाली. पण, त्यावर चालक, ऑपरेटर नाही. यामुळे यंत्र वापरात नाही. तरीही कारखान्याचे काटे नियमित तपासले जातात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काट्यात तफावत असलेल्या कारखान्यांविरोधात आमच्याकडे तक्रार करावी. - दत्तात्रय पवार, प्रभारी, उपनियंत्रक, वैधमापन विभाग, कोल्हापूर.