इचलकरंजीत महावितरणची ९५ कोटी थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:51 IST2021-02-05T06:51:36+5:302021-02-05T06:51:36+5:30

इचलकरंजी : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वीज बिलात सवलत मिळेल अशा भावनेतून येथील ग्राहकांनी वस्त्रोद्योगाबरोबरच घरगुती, शेती आणि अन्य व्यवसायाची वीज ...

95 crore arrears of MSEDCL in Ichalkaranji | इचलकरंजीत महावितरणची ९५ कोटी थकबाकी

इचलकरंजीत महावितरणची ९५ कोटी थकबाकी

इचलकरंजी : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वीज बिलात सवलत मिळेल अशा भावनेतून येथील ग्राहकांनी वस्त्रोद्योगाबरोबरच घरगुती, शेती आणि अन्य व्यवसायाची वीज बिले थकवली आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीच्या इचलकरंजी विभागाकडे जानेवारी २०२१ अखेर तब्बल ९५ कोटी इतकी थकबाकी असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सोमाण्णा कोळी यांनी दिली.

समस्यांच्या गर्तेत सापडलेला वस्त्रोद्योग कोरोना महामारीच्या संकटाने आणखीनच अडचणीत आला. संपूर्ण उद्योग, व्यवसाय, कंपन्या बंद ठेवाव्या लागल्याने मंदी निर्माण झाली. आता हा व्यवसाय पूर्वपदावर येत असला तरी बँकांचे हप्ते, वीज बिले व अन्य देणी भागवेपर्यंत व्यवसायाची घडी बसण्यास वेळ लागणार आहे. शहरात वस्त्रोद्योग व्यवसायाशी निगडित १६ हजार ७०० ग्राहक असून त्यापैकी ६ हजार १२५ ग्राहकांची थकबाकी ३५ कोटी इतकी आहे. घरगुती वीज ग्राहकांची संख्या ४८ हजार ३२४ इतकी असून त्यांची थकबाकी २४.२५ कोटी आहे, तर इतर व्यवसाय क्षेत्रातील ५ हजार ९५२ ग्राहकांची ५.८६ कोटी थकबाकी आहे. त्याचबरोबर ६ हजार शेतीपंपाची १५ कोटी थकबाकी आहे; परंतु शेती पंपासाठी २०२०-२१ ची थकबाकी भरणाऱ्या ग्राहकाला शासनाने ५० टक्के सवलत दिल्याने सध्या असणारी १५ कोटींची थकबाकी १०० टक्के वसुलीअंती ७.५ कोटी इतकी होईल. कोरोनामुळे नागरिक घरीच होते. उद्योग, व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे अनेकांनी वीज बिले भरलीच नाहीत. मात्र, उद्योग, व्यवसाय चालू होत असून नागरिक बिले भरू लागले आहेत. नागरिकांना बिल भरण्यासाठी सक्ती न करता महावितरणची बाजू ग्राहकाला समजावून सांगून समान हप्त्यामध्ये बिल भरण्याची सवलत दिली गेल्याने वसुलीला प्रतिसाद मिळत असल्याचेही कोळी यांनी सांगितले.

Web Title: 95 crore arrears of MSEDCL in Ichalkaranji