कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी ३१८ केंद्रांवर चुरशीने ७८.८७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान मुरगुड पालिकेत नोंदविण्यात आले. बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीनवरून कागलमध्ये सकाळी काहीसा गोंधळ उडाला तर गडहिंग्लजमध्ये बोगस मतदान करताना रोखल्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर हुपरी, शिरोळ, जयसिंगपूर, पेठवडगावमध्ये हमरीतुमरी, बाचाबाचीचे प्रकार घडले. तेरा नगराध्यक्षपदासाठी ५६ उमेदवार व २५४ नगरसेवकपदांसाठीच्या ८०० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. गडहिंग्लजमधील एका प्रभागाचे मतदान दि. २० डिसेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार निकालासाठी मात्र २१ डिसेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात गेले पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडाला होता. महायुती आणि महाविकास आघाडीबरोबरच महायुतीतील घटक पक्षांमध्येही आरोप-प्रत्यारोपांची राळ उडविण्यात आल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. मंगळवारी सकाळी साडेसातपासून ३१८ केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात कागल, गडहिंग्लज या ठिकाणी काहीसा गोंधळ उडाला. दिवसभर शांततेत पण ईर्षेने निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळेच सकाळी अकरापर्यंत बहुतांशी नगरपालिकांसाठी ३२ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. दुपारीही मतदानाचा वेग कायम राहिला, दीड वाजता सरासरी ४५.९० टक्के मतदान झाले होते, तर दुपारी साडेतीनपर्यंत ६२ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले होते. सर्वाधिक मतदान मलकापूर नगरपालिकेसाठी तब्बल ७५ टक्के झाले होते. त्यानंतर मतदानाची गती कायम राहिली.
दुपारनंतर मतदारांचा शोध सुरूग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे येथे कमालीची ईर्षा पाहावयास मिळाली. सकाळपासूनच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांची यंत्रणा सक्रिय होती. दुपारनंतर कोणाचे मतदान राहिले, त्यांचा शोध घेऊन त्याचे मतदान करून घेण्यासाठी धडपड सुरू होती.
हुपरीत सौम्य लाठीचार्जहुपरीत दोन्ही गटांत बाचाबाची झाल्याने पाेलिसांनी साैम्य लाठीचार्ज केला. हातकणंगले, शिरोळ, मुरगुडमध्ये हमरीतुमरीचा तर पेठवडगाव, जयसिंगपूरमध्ये किरकोळ बाचाबाची उडाल्याने तणाव निर्माण झाला.
असे झाले मतदान....नगरपालिका एकूण मतदान / झालेले मतदान / टक्केवारी
- जयसिंगपूर ४९,७४७ / ३४९२२/ ७०.२०
- मुरगुड १०,१२८ / ८,९५६ / ८८.४३
- मलकापूर ४,९३६ / ४२९२ / ८६.९९
- वडगाव २३,०४४/ १९,८७३/ ८६.२४
- गडहिंग्लज ३०,१६१ / २२,१८७ / ७३.५६
- कागल २८,७५३ / २३,२३३ / ८०.८०
- पन्हाळा २,९६७ / २,५१२/ ८४.६६
- कुरुंदवाड २२,२२४ / १८,४३५ / ८२.९५
- हुपरी २४,८०२ / २०,०५१ / ८०.८५
- शिरोळ २४,५३९ / १९,०९६ /७७.८२
नगरपंचायत :
- आजरा १४,६८६ / ११,४३४ / ७७.८६
- चंदगड ८,३१५ / ६,९९१ / ८४.०८
- हातकणंगले ११,४३७ / ९,६०६ / ८३.९९