मुलाच्या लग्नासाठी ठेवलेल्या ५० तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, कोल्हापुरात डॉक्टरांच्या फ्लॅटमध्ये भरदुपारी घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:40 IST2025-08-13T11:38:50+5:302025-08-13T11:40:26+5:30
सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच नाहीत

मुलाच्या लग्नासाठी ठेवलेल्या ५० तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, कोल्हापुरात डॉक्टरांच्या फ्लॅटमध्ये भरदुपारी घरफोडी
कोल्हापूर : सीपीआरमधील मेडिसिन विभागप्रमुख डॉ.अनिता अरुण परितेकर (वय ५७, रा.अनंत प्राइड, न्यू शाहुपुरी, कोल्हापूर) यांनी मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या ५० तोळे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. हा प्रकार सोमवारी (दि. ११) दुपारी घडला.
फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी लाकडी कपाटातील सोन्यासह हिऱ्याचे दागिने आणि २५ हजारांची रोकड लंपास केली. गजबजलेल्या वस्तीत भरदुपारी झालेल्या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाहुपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ.परितेकर या सीपीआरमध्ये मेडिसिन विभागप्रमुख आहेत. त्याचे पती महापालिकेत अधिकारी आहेत. मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेतो. सोमवारी सकाळी परितेकर दाम्पत्य कामासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर, अकराच्या सुमारास मुलगा क्लासला गेला. दुपारी अडीच वाजता स्वयंपाकीण आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी फोन करून याची माहिती डॉ.परितेकर यांना दिली.
परितेकर यांनी तातडीने घरी पोहोचून पाहिले असता, बेडरूमधील लाकडी कपाटातील तीन मंगळसूत्रे, कर्णफुले, सोनसाखळी, विविध आकाराच्या अंगठ्या, तोडे, ब्रेसलेट, हिऱ्याचे टॉप्स असे ५० तोळ्यांचे दागिने आणि २५ हजारांची रोकड चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजारभावानुसार याची किंमत सुमारे ५५ लाख रुपये आहे.
माहिती मिळताच शाहुपुरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही. पोलिसांनी परितेकर यांची फिर्याद घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्याप कोणताही सुगावा हाती लागलेला नाही.
सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच नाहीत
अनंत प्राइड इमारतीत बेसमेंटला कॉमन सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र, आठ दिवसांपूर्वीच तो बंद पडला. डॉ.परितेकर यांनी गेल्या महिन्यात स्वत:च्या फ्लॅटबाहेर लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणले आहेत. मात्र, वेळेअभावी ते लावता आले नाहीत. नेमकी याच वेळेत चोरी झाली.
चांदीच्या दागिन्यांना हात लावला नाही
परितेकर यांच्या घरात चांदीचेही दागिने होते. मात्र, चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यांना हातही लावला नाही. चोख सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, तसेच किमती रत्न त्यांनी लंपास केले. यावरून चोरटे सराईत असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला.
मुलाच्या लग्नाची तयारी
परितेकर दाम्पत्याच्या मुलीचे लग्न झाले असून, त्यांना एक नात आहे. मुलाचे लग्न अजून व्हायचे आहे. मुलगा आणि नातीच्या लग्नासाठी त्यांनी दागिने जपून ठेवले होते. त्यावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने परितेकर कुटुंबीयांना धक्का बसला.