Kolhapur: आजऱ्यात ४७ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा अपहार, फायनान्स कंपनीच्या मॅनेजरसह ८ जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:00 IST2025-10-04T11:59:59+5:302025-10-04T12:00:16+5:30
दोघांना अटक

Kolhapur: आजऱ्यात ४७ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा अपहार, फायनान्स कंपनीच्या मॅनेजरसह ८ जणांविरोधात गुन्हा
आजरा : मुथूट फिनकॉर्प या फायनान्स कंपनीच्या आजरा शाखेत २१ लाख ५२ हजार रुपयांच्या ४७ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा अपहार झाल्याची फिर्याद मुथूट फिनकाॅर्पचे एरिया मॅनेजर संदीप जामदार यांनी आजरा पोलिसात दिली. याप्रकरणी आजरा पोलिसांनी मॅनेजरसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपीसह ६ आरोपी फरार आहेत. मॅनेजर व कर्मचाऱ्याने ग्राहकांशी संगनमत करून अपहार केल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, ग्राहकांशी संगनमत करून बनावट सोने ठेवून घेणे व ग्राहकांना कर्ज देणे. त्यापैकी काही रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घेणे तसेच ग्राहकाने कंपनीमध्ये तारण ठेवलेले खरे सोन्याचे दागिने बदलून त्या जागी बनावट दागिने ठेवून अपहार करणे असे प्रकार मॅनेजर दिनकर रामचंद्र वडर ( रा. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज), कर्मचारी स्नेहल शिवाजी माडभगत ( रा. दर्डेवाडी, ता. आजरा) इरशाद चाॅंद ( रा. फकीरवाडा, ता. आजरा), शांताराम कांबळे (रा. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज), गणेश सावंत (रा. अवचितनगर बांबवडे, ता. शाहूवाडी), गुणाजी नेवगे (रा. पोळगाव, ता. आजरा), विजय देसाई (रा. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज), नोवेल लोबो (रा. शिवाजीनगर आजरा) यांनी २० सप्टेंबर २०२४ ते १४ मे २०२५ या कालावधीत केले आहेत.
सर्वांनी संगनमत करून बनावट सोने मुथूट फिनकॉर्पच्या आजरा शाखेत ठेवले व काही रक्कम घेऊन फसवणूक केली आहे. तीन ग्राहकांनी कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोन्याचे दागिने मॅनेजर व कर्मचारी यांनी परस्पर बाहेर काढून त्या ठिकाणी बनावट दागिने ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी स्नेहल माडभगत व नोवेल लोबो या दोघांना अटक केली. मुख्य आरोपी दिनकर वडर यासह अन्य आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.
कुंपणानेच शेत खाल्ले..
अपहर प्रकरणातील मुख्य आरोपी मॅनेजर दिनकर वडर, कर्मचारी स्नेहल भाडभगत हे प्रत्यक्ष सहभागी आहेत. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांच्या खऱ्या दागिन्यांवर डल्ला मारल्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ले आहे.