सांगलीच्या व्यापाऱ्याला कोल्हापुरात २० लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:24 AM2021-03-08T04:24:34+5:302021-03-08T04:24:34+5:30

कोल्हापूर : कमी व्याजदराने एक कोटी रुपये कर्जाचे आमिष दाखवत चौघा भामट्यांनी सांगलीतील व्यापाऱ्याला २० लाख रुपयांचा गंडा घातला. ...

20 lakh bribe to Sangli trader in Kolhapur | सांगलीच्या व्यापाऱ्याला कोल्हापुरात २० लाखांचा गंडा

सांगलीच्या व्यापाऱ्याला कोल्हापुरात २० लाखांचा गंडा

Next

कोल्हापूर : कमी व्याजदराने एक कोटी रुपये कर्जाचे आमिष दाखवत चौघा भामट्यांनी सांगलीतील व्यापाऱ्याला २० लाख रुपयांचा गंडा घातला. फिल्मी स्टाईलने दोघे तोतया पोलीस उभा करून हा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगलीतील एका व्यापाऱ्याची काही दिवसांपूर्वी एका भामट्याशी तोंडओळख झाली. भामट्याने आपण मोठे कर्ज कमी व्याजदराने अनेकांना दिल्याचे सांगितले. व्यापाऱ्यालाही एक कोटी कर्ज चार टक्के व्याजदराने देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी भामट्याने अटी घातल्या. कर्जासाठी २० लाख रुपये डिपॉझीट (तारण) ठेवावे लागतील, असेही सांगितले. त्या अटी, शर्ती व्यापाऱ्याने मान्य केल्या.

एक कोटी रुपयाच्या कर्जासाठी व्यापाऱ्याला भामट्याने कोल्हापुरात बोलावले. नियोजनानुसार व्यापारी मित्रांसह वीस लाख रुपये घेऊन कोल्हापुरात तावडे हॉटेल परिसरात आले. भामटा हा साथीदारांसह तेथे आला. तेथे त्यांची चर्चा झाली. व्यापाऱ्याने २० लाख रुपये भामट्याकडे दिले. भामट्याने ती रक्कम आपल्या साथीदाराकडे दिली. त्याला हे २० लाख रुपये घेऊन जा आणि कर्जाचे कोटी रुपये घेऊन ये, असे सांगितले. सहकारी पैसे घेऊन तेथून निघून गेला. भामटा हा व्यापाऱ्यासोबतच बसून होता. थोड्यावेळाने तेथे दोघे पोलीस आले. ते भामट्याला घेऊन गेले. काहीवेळाने फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी तक्रारीसाठी शाहूपुरी पोलीस गाठले.

तोतया पोलीस आले अन्‌ त्याला घेऊन गेले

तावडे हॉटेल परिसरात भामट्याचे दोघे मित्र व्यापाऱ्याचे २० लाख रुपये घेऊन एक कोटी कर्ज आणण्याच्या निमित्ताने निघून गेले, पण काही वेळातच दोघे तोतया पोलीस तेथे आले. त्यांनी, तू का तोच, असे म्हणत भामट्याला पकडले. त्याला घेऊन ते हॉटेलच्या बाहेर पडले. व्यापारी व त्याच्या मित्रांना शंका आली. त्यांनी हॅाटेलबाहेर डोकावून पाहिले असता बाहेर कोणीच नव्हते. संबंधित भामटा व तोतया पोलीसही बेपत्ता झाले होते. त्यांनी त्यांचा परिसरात शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. चौघा भामट्यांनी अक्षरश: फिल्मी स्टाईलने व्यापाऱ्याला २० लाखांचा गंडा घातल्याचे लक्षात आले.

Web Title: 20 lakh bribe to Sangli trader in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.