डोंबिवली घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात केडीएमसीची धडक कारवाई
By मुरलीधर भवार | Updated: April 18, 2026 21:49 IST2026-04-18T21:49:10+5:302026-04-18T21:49:42+5:30
शुक्रवारी फेरीवाला पथक घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी पाेहचले होते.

डोंबिवली घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात केडीएमसीची धडक कारवाई
- मुरलीधर भवार
डोंबिवली : घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात केडीएमसीने फेरीवाल्याच्या विरोधात शुक्रवारी कारवाई केली होती. या कारवाईच्या वेळी केडीएमसी अधिकाऱ्यावर बांबूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर केडीएमसीचे कारवाई पथक आज पु्न्हा सगळा फौजफाटा घेऊन पेंढरकर कॉलेज परिसरातील पोहचले. आज फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली. त्याठिकाणच्या जवळपास ४० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी फेरीवाला पथक घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी पाेहचले होते. त्याठिकाणी कारवाईस एका सँडविच विक्रेत्याने तीव्र विरोध केला. अधिकारी सुरेश कामराज याला बांबूने मारहाण केली. या घनटेत सुरेश कामराज जखमी झाले. त्यामुळे पथकाला काल कारवाई न करताच माघारी फिरावे लागले होते. फेरीवाल्यांचा कारवाईस झालेला विरोध पाहता महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बाेरकर यांनी आज फेरीवाला हटाव पथकासह सगळा फौजफाटा घेऊन घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरातील सगळया फेरीवाल्यांच्या विरोधत धडक कारवाई केली. आजही फेरीवाल्यांनी कारवाईस विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज त्यांचा विरोध कारवाई पथकाने हाणून पाडला. सगळे फेरीवाले पिटाळून लावण्यात आले. यावेळी काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अधिकारी वर्गावर गंभीर आरोप केले. फेरीवाल्यांकडून महापालिकेचे कारवाई पथक पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र हा आरोप प्रशासनाने फेटाळून लावला. जवळपास ४० टपऱ्या हटविण्याची कारवाई आज करण्यात आली.
घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांनी रस्ते अडविले आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होतो. विशेष म्हणजे पेंढरकर कॉलेजच्या गल्लीत एक मोठी खाऊ गल्ली तयार झाली आहे. काही जणांनी त्यांची हॉटेल आणि स्टॉल टेम्पो गाडीत थाटली आहेत. कारवाई पथक येताच गाडी घेऊन ही मंडळी पसार होतात. एकाने डबल डेकर बस स्वरुपात छोटे खानी हॉटेल थाटले होते. त्याला रोषणाई केली आहे. ती गाडी आज कारवाईच्या वेळी त्याठिकाणी नव्हती. मात्र त्याच प्रकारची गाडी आत्ता काटई-अंबरनाथ राेडवरील हेदूटणे गावाच्या पुढे उभी असते.