हप्ता घेऊनही पालिकेने मराठी तरुणीचा स्टॉल उचलला, थेट राज ठाकरेंनी घेतली दखल; अविनाश जाधवांना पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:33 IST2026-01-24T15:32:04+5:302026-01-24T15:33:05+5:30
डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात शोरमा विक्री करणाऱ्या एकता सावंत या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर करुन आपली व्यथा मांडली होती.

हप्ता घेऊनही पालिकेने मराठी तरुणीचा स्टॉल उचलला, थेट राज ठाकरेंनी घेतली दखल; अविनाश जाधवांना पाठवले
शोरमा विक्री करणाऱ्या एका मराठी तरुणीवर अन्याय होत असल्याचा आरोप करत तिच्या व्हिडिओने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले असून, या प्रकरणाची थेट दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. परप्रांतीय फेरीवाल्यांना टपऱ्या लावण्याची मुभा दिली जाते, मात्र मराठी असल्यामुळे आपल्यालाच वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.
डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात शोरमा विक्री करणाऱ्या एकता सावंत या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर करुन आपली व्यथा मांडली होती. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाच्या फेरीवाला कारवाई पथकाकडून केवळ आपल्यावरच कारवाई केली जात असल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या शेजारील इतर परप्रांतीय फेरीवाल्यांच्या टपऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याचे तिचे सांगितले.
राज ठाकरेंनी दखल घेतली
दरम्यान, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत मनसे नेते अविनाश जाधव यांना डोंबिवलीत पाठवले. अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह डोंबिवलीत येऊन एकता सावंत यांची भेट घेतली. स्टेशन परिसरात जवळपास तासभर चर्चा करत त्यांनी तिला निर्भयपणे आपला व्यवसाय सुरू ठेवण्यास सांगितले.
यावेळी अविनाश जाधव यांनी एकता सावंत यांना, या प्रकरणात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांशी राज ठाकरे स्वतः चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. मराठी तरुणीवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेकडून मांडण्यात आली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाला कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, परप्रांतीय फेरीवाले बिनधास्तपणे टपऱ्या लावत असताना मराठी तरुणीला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप चर्चेचा विषय ठरत आहे.