कल्याण - काश्मीरातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच ते राहत असलेल्या इमारतीतून हळहळ व्यक्त होत आहे.
अतुल मोने डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहत होते. ते आपल्या कुटुंबासह जम्मू-काश्मीर येथे फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि पत्नी देखील जम्मू काश्मीर फिरण्यासाठी गेल्या होत्या. सोबतच आणखी तीन नात्यातील कुटुंबेही होती. असे समजते.
अतुल हे रेल्वेमध्ये कार्यरत असल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. सोसायटीची मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये आपण कुटुंबासह जम्मू-काश्मीर येथे फिरायला जाणार आहोत, अशी माहिती अतुल मोने यांनी दिली होती... मोने हे आमचे खूप चांगले मित्र होते असे सांगताना शेजारी भावूक झाले.