National kabaddi competition: Maharashtra, Bihar, Indian Railways, Karnataka quarter-finals | राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्र, बिहार, भारतीय रेल्वे, कर्नाटक उपांत्यपूर्व फेरीत दाखल
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्र, बिहार, भारतीय रेल्वे, कर्नाटक उपांत्यपूर्व फेरीत दाखल

रोहा : रोहा येथे सुरू असलेल्या ६६ व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी थरार बघायला मिळाला. येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने केरळचा ५४-३८ असा पराभव करीत आगेकूच केली. रिषांक देवाडिका व तुषार पाटील यांनी सुंदर खेळ केला.

रिषांकने आपल्या पहिल्या चढाईत बोनस गुण करीत महाराष्ट्राच्या गुणांचे खाते खोलले. ८व्या मिनिटाला तुषार पाटीलने शिलकी ४ गडी एकाच चढाईत टिपत केरळवर पहिला लोण देत १५-०४ अशी आघाडी घेतली. पुन्हा जोरदार आक्रमण करीत दुसरा लोण देत आणला होता, पण केरळच्या शिलकी एक खेळाडूने बोनससह दोन गडी टिपत व नीलेश साळुंखेची अव्वल पकड करीत होणारा लोण केरळने लांबविला. मध्यंतराला २४-१२ अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. मध्यंतरानंतर तिसºया मिनिटाला दुसरा लोण देत महाराष्ट्राने २९-१३ अशी आघाडी घेतली. तिसरा लोण देताना पुन्हा एकदा तुषारने ६व्या मिनिटाला ४ गडी टिपले तर शिलकी दोन गडी रिषांकने टिपत ७ व्या मिनिटाला लोण देत ४२-१८ अशी आघाडी वाढविली. यानंतर तुषारला विश्रांती देण्यात आली. पण मध्यंतरानंतर ११ व्या मिनिटाला एका लोणची परतफेड करीत केरळने ३०-४५ अशी आघाडी कमी केली.

पुन्हा एकदा महाराष्ट्राने जोरदार कमबॅक करीत १६ गुणांनी सामना खिशात टाकला. महाराष्ट्राकडून तुषार पाटीलने ७ चढाया करीत १० गुण मिळविले. अजिंक्य पवारने ८ चढायात ८ गुण घेतले. रिषांकने देखील चढायात गुण घेतले. विशाल माने व विकास काळे यांनी ४-४ पकडी घेत आपली भूमिका पार पाडली. केरळकडून जिष्णू के.के. यांनी ८ चढायात २ बोनस व ६ गडी टिपले. सागर कृष्णाने ४ पकडी करीत चांगला प्रतिकार केला.

दुसºया सामन्यात बिहारने राजस्थानचा प्रतिकार ४५-४४ असा मोडून काढत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यंतराला २३-१९ अशी आघाडी बिहारकडे होती. बिहारकडून नवीनने ३४ चढाया करताना ३ बोनससह १९ गुण मिळवीत या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. राजस्थानकडून सचिनने १७ चढायात ३ बोनस व १२ गुण घेत चांगला प्रतिकार केला. इतर सामन्यात कर्नाटकने पाँडेचेरीला ६४-२२ असे, तर भारतीय रेल्वेने दिल्लीला ५६-३१ असे नमवित आगेकूच केली.
 


Web Title: National kabaddi competition: Maharashtra, Bihar, Indian Railways, Karnataka quarter-finals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.