फुलं आणि अत्तरानं नव्हे, वऱ्हाडींचं स्वागत चिखलानं; भारतातील 'या' राज्यात अनोखी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:12 IST2026-04-28T08:11:18+5:302026-04-28T08:12:03+5:30

ही अनोखी परंपरा आजची नसून महाभारत काळापासून चालत आली आहे. त्यांचा दावा आहे की शतकांपासून चालत आलेल्या या रिवाजांनी समाजाची ओळख जिवंत ठेवली आहे. 

The Manjhi-Majhwar community of Chhattisgarh observes a truly unique custom. the wedding guests welcomed not with flowers or perfume, but with mud | फुलं आणि अत्तरानं नव्हे, वऱ्हाडींचं स्वागत चिखलानं; भारतातील 'या' राज्यात अनोखी परंपरा

फुलं आणि अत्तरानं नव्हे, वऱ्हाडींचं स्वागत चिखलानं; भारतातील 'या' राज्यात अनोखी परंपरा

लग्न म्हटलं की किती धामधूम! वऱ्हाडी आणि पाहुणे मंडळींचं मोठ्या अगत्यानं स्वागत केलं जातं. त्यांची अतिशय सरबराई केली जाते आणि त्यांना काय हवं, नको याकडे जातीनं लक्ष दिलं जातं, पण छत्तीसगडच्या मांझी-मझवार समाजात एक वेगळीच अनोखी प्रथा आहे. इथे वऱ्हाडी आणि वरातीचं स्वागत फुलांनी किंवा अत्तरानं नव्हे, तर चिखलानं केलं जातं! का करतात ते असं? - तर या समाजात लग्नं हे फक्त दोन कुटुंबांचं मिलन नसून निसर्गाबद्दल आदर व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळेच इथे पाहुण्यांचं स्वागत फुलांनी नाही, तर चिखलात लोळून केलं जातं! 

मांझी समाजात नवऱ्या मुलीचे भाऊ सजून-धजून पाहुण्यांचं स्वागत करण्याऐवजी चिखलात लोळून आपला आनंद व्यक्त करतात. आधी ते स्वत:ला चिखलानं माखून घेतात आणि नंतर नाचतात, गातात. त्यानंतर त्याच अवस्थेत वऱ्हाडी आणि पाहुणे मंडळींकडे जातात. वराला हळद आणि तेल लावून मंडपात येण्याचं निमंत्रण देतात. ही परंपरा पार पाडण्यासाठी मुलीच्या बाजूनं खास तयारी केली जाते. त्यासाठी ट्रॉलीभर माती आणली जाते आणि ती वऱ्हाडी मंडळींच्या येण्याच्या रस्त्यावर पसरवली जाते. त्यात पाणी टाकून चिखल केला जातो. या समाजाची आणखी एक खासियत म्हणजे त्यांचं गोत्र, जे पशू-पक्ष्यांच्या नावावर असतं. जसं की म्हैस, मासा किंवा नाग! मुलीच्या घरच्यांचं जे गोत्र असतं, त्याप्रमाणे वऱ्हाडींच्या स्वागताच्या वेळी ते त्याच प्राण्याचं रूप घेतात. उदाहरणार्थ, म्हैस गोत्रातील भाऊ म्हशीसारखी शेपटी बनवून चिखलात लोळत पाहुण्यांचं स्वागत करतात.

लग्नाच्या विधीमध्ये वर आणि वधूही   सहभागी होतात. लग्नाच्या वेळी आपल्या गोत्राशी संबंधित प्राण्यांचे आवाज ते काढतात. मांझी समाजातील ज्येष्ठ लोकांचं म्हणणं आहे की, ही अनोखी परंपरा आजची नसून महाभारत काळापासून चालत आली आहे. त्यांचा दावा आहे की शतकांपासून चालत आलेल्या या रिवाजांनी समाजाची ओळख जिवंत ठेवली आहे. आजच्या काळात जिथे लोक लग्नांवर अवाढव्य खर्च करतात, तिथे मांझी समाजातील लोक आपली ही चिखलाची परंपरा अधिक चांगली मानतात आणि अत्यंत आपुलकीनं, प्रेमानं त्यांची ही परंपरा ते पाळतातही. समाजातील अगदी प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकही लग्न समारंभात चिखलात लोळून आनंद व्यक्त करतात आणि इतरांच्याही आनंदात याच पद्धतीनं सामील होतात.

त्यांच्या मते, आजच्या निव्वळ दिखाऊ आणि खर्चिक लग्नांपेक्षा आमची ही परंपरा खरोखरच खूपच चांगली आहे. ती आम्हाला, समाजातल्या लोकांना निसर्गाच्या अधिक जवळ आणते आणि सामाजिक बांधिलकीही वाढवते. या समाजाच्या लग्नांमध्ये कितीही श्रीमंत असो आणि कितीही गरीब असो,  ते चिखलात लोळतात. कोणीच मोठा नाही आणि कोणीच लहान नाही, सगळे सारखेच आहेत ही भावना रुजवतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्राचीन परंपरेला नवी पिढीही उत्साहानं पुढे नेत आहे. या विधींमध्ये ते केवळ सहभागीच होत नाहीत, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या सांस्कृतिक परंपरेचा प्रचार-प्रसारही करतात..

Web Title : छत्तीसगढ़: फूलों से नहीं, कीचड़ से होता है शादी का स्वागत

Web Summary : छत्तीसगढ़ की जनजातीय शादियों में फूलों की जगह कीचड़ से मेहमानों का स्वागत होता है। यह अनोखी परंपरा प्रकृति के प्रति सम्मान दर्शाती है। दुल्हन के भाई कीचड़ में लोटकर सबको आमंत्रित करते हैं, जो समानता और सामुदायिक भावना को बढ़ावा देती है।

Web Title : Chhattisgarh Tribe Celebrates Weddings with Mud, Not Flowers

Web Summary : In Chhattisgarh's tribal weddings, mud, not flowers, welcomes guests. This unique tradition symbolizes nature's respect. The bride's brothers roll in mud, inviting all to join, fostering equality and community spirit, a stark contrast to lavish weddings.