रेल्वेतील स्वयंपाकघर हे नेहमी रेल्वेच्या मधोमधच का असतं? कारण असं ज्याचा कधी विचारही केला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:03 IST2026-05-08T14:02:30+5:302026-05-08T14:03:56+5:30
Railway Interesting Facts : जास्तीत जास्त रेल्वेत हे स्वयपाकघर रेल्वेच्या मधोमध असतं. पण आपण कधी विचार केलाय का की, ते नेहमी रेल्वेच्या मधोमध का असतं, पुढे किंवा मागे का नसतं? जाणून घेऊ यामागचं कारण...

रेल्वेतील स्वयंपाकघर हे नेहमी रेल्वेच्या मधोमधच का असतं? कारण असं ज्याचा कधी विचारही केला नसेल
Railway Interesting Facts : रेल्वेच्या प्रवासारखा आरामदायक, आनंद देणारा आणि वेगळे अनुभव देणारा दुसरा प्रवास नसतो. आपण सुद्धा हे मान्य कराल. जास्तीत जास्त लोक लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. एकतर प्रवास आराम होतो, दुसरं म्हणजे कमी वेळात लागतो आणि तिसरं म्हणजे स्वस्तात होतो. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. आपल्याला माहीत असेल की, रेल्वेत एक पँट्री कारही असतो. म्हणजे रेल्वेत स्वयपाक करण्याची जागा. बरेच लोक घरूनच आपलं जेवण घेऊन येतात, पण काही लोक रेल्वेतच जेवण करतात. या कोचमध्ये जेवण बनवलं जातं आणि प्रवाशांना दिलं जातं. जास्तीत जास्त रेल्वेत हे स्वयपाकघर रेल्वेच्या मधोमध असतं. पण आपण कधी विचार केलाय का की, ते नेहमी रेल्वेच्या मधोमध का असतं, पुढे किंवा मागे का नसतं? जाणून घेऊ यामागचं कारण...
मधेच का असतो पँट्री कार?
रेल्वेतील पँट्री कार मधे असण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे रेल्वे पूर्णपणे कव्हर करता यावी. म्हणजे हा कोच मधे असण्याचा फायदा असा होतो की, पँट्रीतील कर्मचारी रेल्वेच्या दोन्ही भागांमध्ये सहजपणे आणि लवकर पोहोचू शकतात. असं केल्याने प्रवाशांना जेवण लवकर आणि गरम पोहोचवता येतं. जर समजा रेल्वेच्या एका टोकावर पँट्री कार लावला तर दुसऱ्या टोकावर असलेल्या प्रवाशांपर्यंत जेवण फार उशिरा पोहोचेल किंवा असंही होऊ शकतं की, जेवण येईपर्यंत त्यांचं स्टेशनही येईल.
जनरल डबे शेवटी का असतात?
आता तुम्हाला पॅन्ट्री कारबद्दल माहिती झालीच आहे, तर रेल्वेमध्ये असणाऱ्या जनरल डब्याबद्दलही एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. जनरल कोच सहसा रेल्वेच्या मधोमध का लावला जात नाही, यामागे काही खास कारणे आहेत. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे गर्दीचे व्यवस्थापन. जर जनरल डबे रेल्वेच्या मधोमध लावले, तर प्रवाशांच्या चढ-उतारामुळे प्लॅटफॉर्मच्या मधल्या भागात खूप गर्दी होऊ शकते. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो आणि प्लॅटफॉर्मवर चालणंही अवघड बनतं.
याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. आजकाल जनरल डबा वगळता रेल्वेमधील बहुतेक सर्व डबे एकमेकांशी इंटरलिंक असतात. अशावेळी जर जनरल कोच मधोमध ठेवला, तर इतर डबे दोन भागांत विभागले जाऊ शकतात. त्यामुळे पॅन्ट्री कारमधील कर्मचारी सर्व डब्यांपर्यंत सहज पोहोचू शकणार नाहीत आणि प्रवाशांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.