ममुराबाद नाक्याच्या परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:53+5:302021-01-08T04:47:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून जळगाव शहरातील शनी मंदिराकडे जाणारा वर्दळीचा रस्ता वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस ...

In the vicinity of Mamurabad Naka | ममुराबाद नाक्याच्या परिसरात

ममुराबाद नाक्याच्या परिसरात

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून जळगाव शहरातील शनी मंदिराकडे जाणारा वर्दळीचा रस्ता वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस अरुंद होत चालला आहे. महापालिकेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने अतिक्रमणधारकांना मोकळे रान मिळाले असून या भागात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत.

लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून शनी मंदिराकडे जाताना चौघुले प्लाॅटसमोर असलेला ममुराबाद जकात नाका पूर्वी सहज नजरेस पडत असे. वाढत्या अतिक्रमणांमुळे सदरचा नाका आता दिसेनासा झाला आहे. नाक्याची खोली जेमतेम तग धरून उभी असली तरी आजूबाजूला वाढलेली पक्क्या घरांची अतिक्रमणे पाहिल्यानंतर नाका अतिक्रमणात आहे की महापालिकेच्या जागेत, अशी शंका उपस्थित होते. नाका महापालिकेच्या जागेत असेल तर त्याच्या परिसरात असलेली सर्व घरे नियमित कशी काय झाली आणि अतिक्रमित घरांकडे इतके दिवस महापालिकेने लक्षच दिले नसेल का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतात.

शिवाजीनगरातील पूल वाहतुकीस बंद झाल्यापासून लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालील रस्त्यावरची वाहतूक चारपटीने वाढली आहे. मात्र, वाढत्या अतिक्रमणांमुळे नाका परिसरातील रस्त्याची रुंदी खूपच कमी झाल्यामुळे या ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. वाहतूककोंडीमुळे वाहनधारकांमध्ये वाद होण्याच्या घटनादेखील घडू लागल्या आहेत. निद्रिस्त महापालिका प्रशासनाने अतिक्रमणांकडे वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

-------------------------------

फोटो-

जळगाव शहरातील ममुराबाद नाक्याजवळ वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूककोंडी आणि त्यातून वाट काढताना दुचाकी व चारचाकी वाहनधारक. (जितेंद्र पाटील)

Web Title: In the vicinity of Mamurabad Naka