Jalgaon Accident:जळगावात रस्त्यावर झालेली गर्दी पाहून नेमकं काय झालंय? हे पाहण्यासाठी थांबलेल्या एका तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वतःचे वडील मृत्यूशी झुंज देताना पाहून तरुणाला जबर धक्का बसला. जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घडलेल्या या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५९ वर्षीय ट्रक चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तांबापुरा भागातील रहिवासी असलेले मोहंमद मुसा शेख (वय ५९) हे व्यवसायाने सिमेंट ट्रक चालक होते. २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांनी आपला ट्रक एमआयडीसी परिसरात उभा केला. कामावरून सुटल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला फोन केला आणि त्याला बाईक घेऊन नेण्यासाठी बोलावले. मुलगा येईपर्यंत मुसा शेख हे पायी घराच्या दिशेने निघाले होते.
अज्ञात वाहनाची धडक अन् मुलाच्या काळजाचा ठोका चुकला
मनराज मोटर्स जवळून पायी जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने मुसा शेख यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की शेख रक्ताच्या थारोळ्यात पडले. दरम्यान, वडिलांना घेण्यासाठी घरातून निघालेला मुलगा याच मार्गावरून जात होता. वाटेत त्याला लोकांची मोठी गर्दी दिसली. काय झालंय ते पाहण्यासाठी तो तिथे थांबला, मात्र समोरचे दृश्य पाहून त्याला मोठा धक्का बसला. ज्या वडिलांना घेण्यासाठी तो निघाला होता, तेच तिथे गंभीर अवस्थेत पडलेले होते.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
अपघातानंतर जखमी मुसा शेख यांना तात्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
या घटनेमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरधाव धडक देऊन पसार झालेल्या त्या अज्ञात वाहनाचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी वाहनचालकाचा माग काढत आहेत.
Web Summary : In Jalgaon, a son discovered his father, a truck driver, severely injured after a hit-and-run. The 59-year-old succumbed to his injuries in the hospital. Police are investigating the accident, searching for the responsible vehicle and driver. The family is in mourning.
Web Summary : जलगांव में, एक बेटे ने दुर्घटनास्थल पर अपने पिता, जो एक ट्रक ड्राइवर थे, को गंभीर रूप से घायल पाया। अस्पताल में 59 वर्षीय व्यक्ति की चोटों के कारण मृत्यु हो गई। पुलिस हिट-एंड-रन की जांच कर रही है और जिम्मेदार वाहन और चालक की तलाश कर रही है। परिवार शोक में है।