Join us
Daily Top 2Weekly Top 5

Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:28 IST

Crude Oil Price: जगभरात पुन्हा एकदा महागाईचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळत असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १२० डॉलरच्या पार पोहोचलंय.

Crude Oil Price: जगभरात पुन्हा एकदा महागाईचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळत असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १२० डॉलरच्या पार पोहोचलंय. ही पातळी गेल्या सुमारे चार वर्षांतील सर्वोच्च पातळी मानली जात आहे. यामागील सर्वात मोठं कारण अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव आणि 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) मधील लष्करी संघर्ष हे आहे. या संकटामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून बाजारात भितीचं वातावरण आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल आणि जगातील अर्थव्यवस्था दबावाखाली येऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

अमेरिका-इराण तणाव हे सर्वात मोठं कारण

तेलाच्या किमतीतील वाढीचे प्रमुख कारण अमेरिका आणि इराणमधील वाढता संघर्ष हे आहे. अमेरिकेनं इराणच्या बंदरांवर नौदलाचा दबाव वाढवला असून तेल टँकर्स रोखण्याची कारवाईही तीव्र केली आहे. दुसरीकडं, इराणनंही आपण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. या दोन्ही देशांमधील संघर्ष आता थेट तेल पुरवठ्यावर परिणाम करत आहेत.

आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानं वाढलं संकट

जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' जवळपास बंद झाली आहे. हा मार्ग जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा सांभाळतो. तो बंद झाल्यामुळे कच्चे तेल, गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक जवळजवळ थांबली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा 'सप्लाय शॉक' ठरू शकतो.

पुरवठ्यात मोठी घट, बाजारात खळबळ

अहवालांनुसार, बाजारातील सुमारे १ अब्ज बॅरल तेलाचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो. यामुळे जागतिक बाजारात घबराट वाढली आहे. पुरवठा आणि मागणी यातील संतुलन बिघडल्यामुळे येणाऱ्या दिवसांत किमती आणखी वाढू शकतात, असं व्यापाऱ्यांचं मत आहे.

अमेरिकेच्या रणनीतीमुळे तणाव वाढण्याची शक्यता

अमेरिका आता इराणशी संबंधित तेल टँकर्स जप्त करण्याचा आणि इतर देशांनाही या कारवाईत सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय मध्यपूर्वेमध्ये प्रगत शस्त्रे पाठवण्याची तयारीही केली जात आहे. यावरून हे संकट लवकर संपणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. तेलाच्या किमतीतील या वाढीचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होईल, जे त्यांच्या गरजेचा बहुतांश भाग कच्च्या तेलाच्या आयातीतून पूर्ण करतात. पेट्रोल-डिझेलचे दर वाढू शकतात, ज्यामुळे महागाई आणखी वाढेल. तसेच रुपयावर दबाव वाढू शकतो आणि चालू खात्यातील तूट वाढण्याचाही धोका आहे.

किमती आणखी वाढणार का?

तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिका आणि इराणमधील तणाव असाच सुरू राहिला आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली होऊ शकली नाही, तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १३० डॉलरपर्यंतही जाऊ शकतात. सध्या बाजार अनिश्चिततेच्या काळातून जात असून गुंतवणूकदार सतर्क आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Crude oil prices surge past $120, global economy faces crisis.

Web Summary : Crude oil hits $120/barrel amid US-Iran tensions and Hormuz Strait concerns. Supply disruptions threaten global economy, potentially raising prices and impacting import-dependent nations like India. Experts warn prices could rise further.
टॅग्स :खनिज तेलअमेरिकाअमेरिका-इस्रायल-इराण वॉर