जगातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका 'यूएसएस जेराल्ड आर फोर्ड' अखेर ३०० दिवसांहून अधिक काळ चाललेल्या विक्रमी तैनातीनंतर अमेरिकेला परतणार आहे. १५ मे पर्यंत ही युद्धनौका व्हर्जिनिया येथील आपल्या मूळ तळावर पोहोचेल, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जून महिन्यात व्हर्जिनियातून रवाना झालेली ही युद्धनौका तब्बल १० महिने सातत्याने विविध युद्धजन्य भागात सक्रिय होती. या तैनातीत या जहाजाने दोन मोठी कामे केली. इराणसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत अमेरिकेची ताकद म्हणून हे जहाज तैनात होते. कॅरिबियन समुद्रात वेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना पकडण्याच्या लष्करी मोहिमेतही या जहाजाचा मोठा सहभाग होता.
लाल समुद्रातील आग आणि दुरुस्तीमार्चच्या सुरुवातीला हे जहाज लाल समुद्रात असताना त्याच्या 'लाँड्री' विभागात आग लागली होती. या दुर्घटनेमुळे जहाजावरील शेकडो सैनिकांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता, परिणामी जहाजाला दुरुस्तीसाठी पुन्हा भूमध्य समुद्रात परतावे लागले होते. इराणने या युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा केला होता. अमेरिकेने याची पुष्टी केली नव्हती. परंतू, इराणच्या समुद्रातून ही युद्धनौका हलविण्यात आली होती.
ट्रम्प घेणार इराणवर हल्ल्याचा आढावा...दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी इराणविरोधी संभाव्य लष्करी कारवाईची माहिती घेणार आहेत. अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रमुख ब्रॅड कूपर हे ट्रम्प यांना ब्रीफिंग देतील. इराणवर 'लहान पण अत्यंत शक्तिशाली' हल्ले करण्याची योजना अमेरिकेने आखली आहे. थेट दीर्घकालीन युद्ध करण्यापेक्षा इराणवर दबाव आणून त्यांना वाटाघाटीसाठी झुकवणे हा मुख्य उद्देश आहे. इराणचा युरेनियमचा साठा ताब्यात घेण्यासाठी 'स्पेशल फोर्स' पाठवण्याबाबतही अमेरिका विचार करत आहे.