पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान पार पडलं. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला, मात्र काही ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना समोर आल्या. याच दरम्यान एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका घटनेत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्याचं डोकं फोडलं आणि त्याचे दात पाडण्यात आले. तिसरी घटना तर अत्यंत धक्कादायक आहे, जिथे मतदान करायला गेलेल्या एका महिलेला ती कागदोपत्री 'मृत' असल्याचं सांगण्यात आलं.
उदयनारायणपूर ब्लॉकच्या खोसालपूर ग्रामपंचायतीमधील बलरामपूर प्राथमिक विद्यालयाच्या बूथ क्रमांक २४५ वर ८१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. पूर्णचंद्र डोलुई असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की, हे वृद्ध आपल्या मुलासोबत मतदान करण्यासाठी आले होते, परंतु त्यांच्या मुलाला बूथच्या आत जाऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांना एकट्यानेच आत जावं लागलं. मतदान करून बाहेर येत असताना उशीर झाल्याच्या कारणावरून केंद्रीय दलाच्या जवानांनी त्यांना धक्का दिला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
"TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
जिवंत महिला मतदार यादीत 'मृत'
केतुग्राम विधानसभा मतदारसंघातील नैहाटी येथील बूथ क्रमांक २४१ वर एक धक्कादायक घटना घडली. झरना विश्वास नावाची महिला आपला मुलगा आणि सुनेसोबत मतदान करण्यासाठी पोहोचली. मात्र निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन मतदार यादीत 'मृत' घोषित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. बीएलओने (BLO) यादी दाखवून मृत्यूची माहिती दिली. यामुळे झरना विश्वास यांना मतदान करता आलं नाही, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मतदान केलं. आता झरना विश्वास जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या सुनेने सांगितलं की, "आम्ही मतदान करायला गेलो होतो, तिथे समजलं की माझी सासू मेली आहे, पण आम्ही त्याच 'मृत' सासूला घेऊन सुखरूप घरी परतलो आहोत."
TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दातही पाडले
आमता येथील ताजपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा गंभीर आरोप आहे. आमता विधानसभा मतदारसंघातील ताजपूर मिरपाडा येथील बूथ क्रमांक १८७ जवळ TMC कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात एका कार्यकर्त्याचं डोकं फोडण्यात आलं असून त्याचे दातही तुटले आहेत. या हल्ल्यामागे सीपीएम (CPIM) आणि आयएसएफ (ISF) कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. मात्र विरोधी पक्षांकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
निवडणुकीत विक्रमी मतदान
बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांवर तब्बल ९२.६% मतदान झाले. दोन्ही टप्पे मिळून सर्व २९४ जागांची एकूण मतदानाची टक्केवारी ९२.९% वर पोहोचली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आकडा २०२१ च्या मतदानापेक्षा (८१.५%) कितीतरी जास्त आहे. भारतातील कोणत्याही विधानसभा निवडणुकीतील हे आतापर्यंतचे सर्वोच्च मतदान ठरले आहे. यापूर्वी २०११ मध्ये बंगालमध्ये ८४.३% इतके विक्रमी मतदान झाले होते.
Web Summary : West Bengal's second phase saw poll violence, a senior citizen's death allegedly due to a push by central forces, a TMC worker injured, and a living woman declared dead on voter lists.
Web Summary : पश्चिम बंगाल के दूसरे चरण में चुनावी हिंसा, केंद्रीय बलों द्वारा कथित धक्का देने से एक वरिष्ठ नागरिक की मौत, एक टीएमसी कार्यकर्ता घायल और एक जीवित महिला को मतदाता सूची में मृत घोषित कर दिया गया।