जळगावच्या महापौरांच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:14 PM2020-08-05T12:14:07+5:302020-08-05T12:16:19+5:30

शहरात वाढता संसर्ग, नवीन ५० रूग्ण

Three members of Jalgaon mayor's family | जळगावच्या महापौरांच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण

जळगावच्या महापौरांच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण

Next

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी जळगाव शहरात आणखी ५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार १४७ वर पोहोचली आहे़ दुसरीकडे महापौरांच्या कुटुंबातील तीन जणांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.
विविध विभागात वाढता फैलाव
जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ यात जळगाव शहरात अधिकच फैलाव वाढत असून विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील बाधित होत आहेत. यामध्ये जि.प.तील अधिकारी, पदाधिकारी बाधित होत असताना कोरोनाचा महापालिकेतही शिरकाव झाला. तेथेही अधिकाऱ्यांना बाधा होण्यासह आरोग्य विभागातील कोरोना योद्घानांही कोरोनाची लागण झाली. आता तर या कोरोनाची महापौरांच्या कुटुंबियांनाही लागण झाली आहे.
लक्षणे नाही
मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ३४५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले.यात जळगाव शहरात आढळून आलेल्या ५० बाधितांमध्ये महापौरांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचाही समावेश आहे़ या तिन्ही सदस्यांनी मंगळवारी सकाळी अ‍ॅण्टीजन टेस्ट केल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले़ मात्र, तिघांना कुठलेही लक्षण नाहीत़ त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़
मनपात वाढती बाधा, अधिकारी रजेवर
मनपाच्या सहायक आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याने ते रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील हा पदभार प्रभाग समिती चारचे प्रभाग अधिकारी तथा शाखा अभियंता उदय मधुकर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पाटील यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला असून स्वत:चे काम सांभाळून त्यांनी हे काम पहावे, असे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आदेशामध्ये म्हटले आहे.
या भागात आढळले रुग्ण
मंगळवारी महाबळ ४, आयोध्यानगर ४, शनीपेठ ३, सिंधी कॉलनी २, पोलीस लाईन २, रुख्मिनीनगर २, शिवाजीनगर २ यासह देवेंद्र नगर, पिंप्राळा, हिराशिवा कॉलनी, गेंदालाल मिल, दांडेकर नगर, व्यंकटेश नगर, पांडे चौक, नारायणी पार्क, ओम शांती नगर, हरी विठ्ठल नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
शहरात सर्वाधिक रुग्ण
जळगाव शहरात सर्वाधिक एकूण ३ हजार १४७ कोरोना रुग्ण असून मंगळवारी देखील नवीन ५० रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे एका दिवसात १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक ५ मृत्यू हे जळगाव शहरातील बाधितांचे झाले आहे़

Web Title: Three members of Jalgaon mayor's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव