केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रेमडेसिविरचा तुटवडा -एकनाथ खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 11:33 PM2021-04-18T23:33:58+5:302021-04-18T23:34:13+5:30

राजकारण दूर ठेवत कोरोनावर मात करणे आवश्यक जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत सुरू असताना रेमडेसिविरची निर्यात सुरूच ...

Shortage of Remedesivir due to wrong policy of Central Government - Eknath Khadse | केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रेमडेसिविरचा तुटवडा -एकनाथ खडसे

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रेमडेसिविरचा तुटवडा -एकनाथ खडसे

googlenewsNext

राजकारण दूर ठेवत कोरोनावर मात करणे आवश्यक

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत सुरू असताना रेमडेसिविरची निर्यात सुरूच राहिल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच निर्यातबंदी केली असती तर रेमडेसिविरचा तुटवडा भासला नसता. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज रुग्णांच्या नातेवाईकांची फिरफिर होत आहे, अशी टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवर केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये रविवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या ठिकाणी  खडसे यांनी भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

राजकारण बाजूला ठेवून मदत आवश्यक
  कोरोनाच्या काळात राज्य सरकार आपल्या अखत्यारीत जे आहे, त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु, रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने मर्यादा येत असून ज्या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या जास्त आहे, किमान अशा ठिकाणी तरी केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेऊन मदत करायला हवी, असे एकनाथ खडसे यांनी सांगत केंद्र सरकारवर टीका केली.  ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन तसेच इतर औषधांचा पुरवठा करायला हवा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

फडणवीस यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले, फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल असे सांगत आहे, परंतु आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटल फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा २ तारीख दिली आहे. मी २ तारखेची वाट पाहतो आहे. जर २ तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेल, असेही खडसेंनी सांगितले.

कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळलो नाही
महाराष्ट्र राज्याची एक परंपरा राहिली आहे. ज्या ज्या वेळी राज्य संकटात आले किंवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला; मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. मी स्वतः विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी काम केले आहे. पण, आम्ही संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही, अशी टीका देखील खडसे यांनी विरोधी पक्षावर केली.  देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, मला वाटते विरोधी पक्षनेत्याकडून हे अपेक्षित नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Shortage of Remedesivir due to wrong policy of Central Government - Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव