राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:17 AM2021-01-25T04:17:41+5:302021-01-25T04:17:41+5:30

राष्ट्रीय मतदार दिवस विशेष जळगाव : मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या ...

Proud to have fulfilled national duty | राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचा अभिमान

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचा अभिमान

Next

राष्ट्रीय मतदार दिवस विशेष

जळगाव : मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टीने प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन नवमतदारांकडून करण्यात येत आहे. यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला प्रथमच मतदान करण्याची संधी मिळाली व ते आपण केले याचा अभिमान वाटतो, अशा भावना नवमतदारांनी व्यक्त केल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच प्रबोधन करणारी उपक्रम राबविले जातात. विशेषत: १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरुणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जातो.

प्रशासकीय पातळीवर असे उपक्रम राबविले जात असले तरी प्रत्येक नागरिकाचे सशक्त लोकशाहीसाठी मतदान करणे हे कर्तव्य आहे, या भावनेतून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन नवमतदारांकडून केले जात आहे.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. या प्रमाणेच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना निर्माण होण्याची गरज असल्याचे मत वडली येथील प्रियंका रमेश पवार या प्रथमच मतदान केलेल्या तरुणीने व्यक्त केले.

मी एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडतो, मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया, हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस असून थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे, असे मत ममुराबाद येथील दिग्विजय शरद पाटील या प्रथमच मतदान केलेल्या तरुणाने व्यक्त केले.

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले याचा अभिमान वाटतो. प्रत्येकाना आपला हा हक्क बजावलाच पाहिजे. गावाच्या विकासासाठी विकासाभिमुख उमेदवाराला यातून निवडता येते.

- प्रियंका रमेश पवार, नवमतदार.

मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टीने प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.

- दिग्विजय शरद पाटील, नवमतदार.

Web Title: Proud to have fulfilled national duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.