मातृदिन विशेष- आईच्या कष्टमय धाग्यांनीच मुलाला दिली  ‘खाकी वर्दी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:26 AM2021-05-09T00:26:35+5:302021-05-09T00:29:50+5:30

आयुष्याची गाडी रुळावर आली असली तरी त्यांच्यातल्या मातृत्वाला आता संसाराचे गोकुळ करण्याची आस लागली आहे.

Mother's Day Special | मातृदिन विशेष- आईच्या कष्टमय धाग्यांनीच मुलाला दिली  ‘खाकी वर्दी’

मातृदिन विशेष- आईच्या कष्टमय धाग्यांनीच मुलाला दिली  ‘खाकी वर्दी’

Next
ठळक मुद्देअंगणवाडीसेविकाचा पतीच्या निधनानंतरचा संघर्षचाळीसगावच्या मंगला सोनवणे यांच्या जिद्दीची मंगलवात

चाळीसगाव : आठवी इयत्तेतच शाळेचं बोट सुटलं आणि पातोंड्याच्या  मंगला सोनवणे  यांची रेशीमगाठ बांधली गेली. शिलाई यंत्राच्या फिरत्या चाकावर त्यांनी संसाराचं वस्रचं शिवायला घेतलं. अंगणवाडी मदतनीस ते सेविका या ३० वर्षात त्यांच्या कष्टमय धाग्यांनी मुलाच्या अंगावर पोलीस उपनिरीक्षकपदाची खाकी वर्दी चढवली. आजही त्यांच्यातील 'आई' उसंत न घेता धावते आहे. मातृदिनी त्यांचे हे आईपण म्हणूनच झळाळून निघते.

अर्ध्यावरती डाव मोडला...
'ऐका ऐका दोस्तहो, मायबापाची कहाणी, माय नारळी खोबरं... बाप नारळाची पाणी...' कवितेच्या या ओळी आई - वडिलांचं कालातीत असणारे महत्व सांगून जातात. कधी-कधी संसार कहाणीचा हा डाव अर्ध्यावर मोडतोही. मंगला सोनवणे यांच्या वाट्याला अर्ध्यावरती डाव मोडण्याचेच दुःख आले. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुशीत तीन मुले होती. मात्र त्या खचल्या नाहीत. जिद्दीने उभ्या राहिल्या. त्यांच्यातील आई 'हिरकणी'प्रमाणे संघर्षाला तयार झाली.  मंगला सोनवणे यांना संकटांचा डोंगर सर करायचा होता.  शिवण काम करतानाच त्यांनी गावातच अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी स्वीकारली. संसाराचा गाढा ओढताना मुलांनाही शिकवले. मुलीचे हात पिवळे करीत तिचा संसारदेखील थाटून दिला. त्यांचा मोठा मुलगा सद्य:स्थितीत वाशिम जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत आहे. दुसरा मुलगाही धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या सेवेत होता. मात्र काही वर्षापूर्वी त्याचे दुर्दैवी निधन झाले.

आई जिद्दीने उभी राहिली म्हणून...
५९ वर्षीय मंगला सोनवणे यांची जणू संघर्षासोबतच जीवनगाठ बांधली गेलीय. शिवणकाम करीत असतानाच १९९२ मध्ये त्या पातोंडा अंगणवाडीत मदतनीस रुजू झाल्या. १९९७ मध्ये त्यांचे पती सुदाम सोनवणे यांचे निधन झाले. यावेळी त्यांच्या पदराखाली १६ वर्षाची मुलगी तर १४ आणि १२ वर्षाचे दोन मुले होती. 

शिक्षणवाट पुन्हा सुरू...
रेशीमगाठीने अडवलेली त्यांची आठवीनंतरची शिक्षणवाट पुन्हा सुरू झाली. दहावी, बारावीची परीक्षा देऊन त्या डीएडही झाल्या. शिक्षिकेच्या नोकरीसाठी मुलाखतीही दिल्या. तथापि, यात त्यांना यश आले नाही. मुलांच्या पंखांमध्ये बळ देण्यासाठी त्या निग्रहाने परिस्थितीशी झगडत राहिल्या. गत ३० वर्षात त्यांनी एकाकी कुटुंबाला सावरले. मुलीचे लग्नदेखील त्यांनीच हिमतीने लावून दिले. आयुष्याची गाडी रुळावर आली असली तरी त्यांच्यातल्या मातृत्वाला आता संसाराचे गोकुळ करण्याची आस लागली आहे.
रडायचं नाही लढायचं !
आठवीत असतानाच डोक्यावर अक्षता पडल्या. पुढे त्रासही भोगला. माहेरी येऊन निर्धाराने उभी राहिली. पतीच्या निधनाचा आघात झेलला. कष्टाची लाज न बाळता लढत राहिले. मुलांनीदेखील माझ्या कष्टांची जाणीव ठेवली. माझ्यातील मातृत्वानेच मला रडायचं नाही तर लढायचं हे शिकवले. जीवनात हा मंत्र पाळला तर संकटांचा पराभव करता येतो.
-मंगला सुदाम सोनवणे, अंगणवाडीसेविका, पातोंडा, ता.चाळीसगाव.

Web Title: Mother's Day Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.