न्यायालयीन कर्मचारी परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्याकडे आढळला मोबाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 00:43 IST2026-04-27T00:41:52+5:302026-04-27T00:43:11+5:30
पोलिसांनी घेतले ताब्यात, शहरात २० केंद्रांवर परीक्षा...

न्यायालयीन कर्मचारी परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्याकडे आढळला मोबाईल
जळगाव : न्यायालयीन कर्मचारी भरती प्रक्रियेंतर्गत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेदरम्यान जळगावातील एका केंद्रावर नितीन भोजराज राठोड या परीक्षार्थ्याकडे मोबाईल आढळला. त्याला जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने रविवारी (२६ एप्रिल) राज्यभरात लिपिक, शिपाई, वाहनचालक या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. यात जळगाव शहरात २० केंद्रांवर ही परीक्षा झाली. यातील गणेश कॉलनीमधील प.न. लुंकड कन्या शाळेच्या केंद्रावर नितीन राठोड हा परीक्षा देत असताना त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पर्यवेक्षकांनी त्याची झडती घेतली. त्या वेळी त्याच्याकडे मोबाईल आढळला. परवानगी नसताना या परीक्षार्थीने परीक्षा केंद्रात मोबाईल नेल्याचे आढळताच जिल्हा पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या वेळी प्रभारी सागर शिंपी व त्यांचे सहकारी परीक्षा केंद्रावर पोहचले. त्यांनी सदर परीक्षार्थीस ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.
या प्रकारानंतर न्यायाधीश व अन्य अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेचे जळगावात जिल्हा न्यायालयाने नियोजन केले होते. त्यात जळगाव शहरात २० केंद्रावर ही परीक्षा झाली. यासाठी एकूण २० हजार २४० परीक्षार्थी होते. त्यापैकी जवळपास ९५ टक्के परीक्षार्थी हजर होते. एकेका परीक्षा केंद्रावर प्रत्येकी ३ पोलिस कर्मचारी, अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होते. तसेच जिल्हा न्यायालयाच्यावतीने परीक्षार्थींसाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती.