‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 06:14 IST2026-04-27T06:13:42+5:302026-04-27T06:14:16+5:30
एका प्रवाशाने तिकीट आरक्षणासाठी प्रथम १० हजार रुपये वॉलेटमध्ये जमा केले. तांत्रिक अडचणींमुळे आरक्षण पूर्ण झाले नाही, तरीही रक्कम बँक खात्यात परत आली नाही.

‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
मुंबई - रेल्वे प्रवाशांना एकाच ॲपवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या ‘रेलवन’ ॲपबाबत प्रवाशांमध्ये नाराजी आहे. तिकीट बुकिंग रद्द झाल्यावर वॉलेटमधील रक्कम पुन्हा बँक खात्यात परत करण्याचा पर्याय नसल्याने पैसे वॉलेटमध्येच अडकून पडत आहेत. त्यामुळे वॉलेटमधील रक्कम बँक खात्यात परत करण्याचा पर्याय द्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.
एका प्रवाशाने तिकीट आरक्षणासाठी प्रथम १० हजार रुपये वॉलेटमध्ये जमा केले. तांत्रिक अडचणींमुळे आरक्षण पूर्ण झाले नाही, तरीही रक्कम बँक खात्यात परत आली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा १० हजार जमा करून केलेल्या प्रयत्नही अयशस्वी ठरला. त्यामुळे २० हजार वॉलेटमध्ये अडकले. याशिवाय, आयआरसीटीसी संकेतस्थळावर तिकीट उपलब्ध दाखवत असूनही ‘रेलवन’ ॲपवर आरक्षण होत नसल्याच्या तक्रारीही आहेत.
यूटीएस ॲपमध्ये काय व्हायचे?
यापूर्वी यूटीएस ॲपमध्ये व्यवहार अयशस्वी झाल्यास रक्कम थेट बँक खात्यात जमा होत होती. मात्र ‘रेलवन’मध्ये अशी सुविधा नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
एक कोटींहून अधिक वापरकर्ते
‘रेलवन’द्वारे आरक्षित, अनारक्षित तिकीट, फलाट तिकीट, पीएनआर तपासणी तसेच गाडीचा ठावठिकाणा यांसारख्या सुविधा देण्यात येत आहेत. आतापर्यंत एक कोटीहून अधिक प्रवाशांनी हे ॲप डाउनलोड केले असून, सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम (क्रिस)कडून त्याची निर्मिती करण्यात आली आहे.