२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 06:22 IST2026-04-27T06:21:57+5:302026-04-27T06:22:36+5:30
लोणेरे हत्याप्रकरणाचा पाच दिवसांत छडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ३० एप्रिलपर्यंत कोठडी

२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
अलिबाग - लोणेरे येथील तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाचा अवघ्या पाच दिवसांत उलगडा करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या धडक कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांच्या कार्यक्षम तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
२१ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीतील लोणेरेच्या ओमकार लॉजमध्ये ही घटना घडली होती. आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार ( ३८) याने एका २२ वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. डोक्यावर आणि दोन्ही हातांच्या मनगटावर गंभीर वार करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला.
गंभीर कलमे लावून कारवाई
या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ६४ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली. विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
असा सापडला आरोपी
तपासादरम्यान आरोपीचा पूर्वीही गंभीर गुन्ह्यांशी संबंध असल्याची माहिती समोर आली. २०२१ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यावर भर दिला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ठाणे शहर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सर्च ऑपरेशन राबवले. ठाणे शहरातील विविध लॉज, डॉरमेट्री आणि रेल्वे स्थानक परिसरात तपास करण्यात आला.
अखेर एका डॉरमेट्रीमध्ये आरोपी राहात असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या यशस्वी कारवाईमुळे एका गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे (महाड विभाग) करत आहेत.