Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:52 IST2025-11-19T15:49:38+5:302025-11-19T15:52:28+5:30
एका तरुणाचा रेल्वे रुळाशेजारी मृतदेह सापडला. त्याची ओळख पटवण्यात आली. हर्षल भावसार असे त्याचे नाव होते. त्याने आत्महत्या केली असावी, असे पोलिसांना वाटले. पण, हर्षलच्या आईने हत्या असल्याची शंका व्यक्त केली. पोलिसांनी तपास केला आणि शंका खरी ठरली.

Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
Jalgaon Crime News : हॉटेलमध्ये जेवण करत असताना हर्षल परेश महाजन या तरुणाला 'चोर पऱ्या' बोलला. याच कारणावरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर वाद वाढला आणि तीन जणांनी हर्षलला बेदम मारहाण केली. हॉटेल आणि शेतात नेऊन केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसावे म्हणून मृतदेह रेल्वे रुळाशेजारी आणून टाकला. हर्षलच्या आईने शंका व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने तपास केला आणि तिघांनी हर्षलची हत्या केल्याचे समोर आले.
हर्षल प्रदीप भावसार (वय ३१, रा. दिनकर नगर) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला मारहाण करून रेल्वे रुळावर टाकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, भूषण संजय महाजन (३१, रा. ज्ञानदेव नगर) याला अटक करण्यात आली आहे. इतर दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
रेल्वे रुळावर सापडला होता हर्षलचा मृतदेह
हर्षल भावसार याचा सोमवारी (१८ नोव्हेंबर) जळगाव ते भादली मार्गावर रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आला होता. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही तपासले असता, त्यात अनेक बाबी समोर आल्या.
आधी हॉटेलमध्येच केली बेदम मारहाण
पोलिसांनी तपास केला असता हॉटेलमध्ये बसल्यानंतर हर्षल हा परेश महाजन याला चोर पऱ्या बोलल्याच्या कारणावरून त्याचा भूषण संजय महाजन व लोकेश मुकुंदा महाजन यांच्यासोबत वाद झाला. दोघांनी त्याला हॉटेलमध्ये मारहाण केली. त्यानंतर हर्षल तेथून निघून गेला.
पुन्हा पकडले आणि शेतात नेले
मारहाण करणाऱ्यांसह परेश महाजनने हर्षलला का.ऊ. कोल्हे शाळेजवळ पकडले. तेथून दुचाकीवर बसवून त्याला असोदा शिवारातील शेतात नेऊन मारहाण केली व त्याला रेल्वे रुळावर फेकून दिले. यावेळी रेल्वेची धडक लागल्याने हर्षलचा मृत्यू झाला, अशी फिर्याद मयताच्या आईने शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताने दिली गुन्ह्याची कबुली
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भूषण महाजन याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने हर्षलला मारहाण केल्यानंतर रेल्वे रुळावर फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.