किडनीविकारग्रस्त भगिनीला उपमुख्यमंत्र्यांचा आधार; उपचारासाठी एकनाथ शिंदेंनी सोबत विमानात घेतले

By विलास बारी | Updated: June 6, 2025 23:58 IST2025-06-06T23:58:04+5:302025-06-06T23:58:38+5:30

हाॅस्पिटल प्रशासनाकडून किडनी डोनर उपलब्ध झाला असून आवश्यक त्या चाचण्यासाठी शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत मुंबईला पोहचण्याचा संदेश प्राप्त झाला

Deputy Chief Minister's support for sister suffering from kidney disease; Eknath Shinde took her on a plane for treatment in Mumbai | किडनीविकारग्रस्त भगिनीला उपमुख्यमंत्र्यांचा आधार; उपचारासाठी एकनाथ शिंदेंनी सोबत विमानात घेतले

किडनीविकारग्रस्त भगिनीला उपमुख्यमंत्र्यांचा आधार; उपचारासाठी एकनाथ शिंदेंनी सोबत विमानात घेतले

विलास बारी

जळगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दाैऱ्यादरम्यान विमानाच्या उड्डाणाचा विलंब जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथील किडनीविकारग्रस्त महिला रुग्णाला लाभदायी ठरला. तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या या किडनीविकारग्रस्त लाडक्या बहिणीला सोबत विमानात घेऊन शिंदे मुंबईकडे रवाना झाले.

जामनेर तालुक्यातील शहापूर येथील शीतल आनंद बोर्डे (३५) या महिलेची किडनी निकामी असल्यामुळे गेल्या आठ वर्षापासून डायलिसीस सुरू आहे. या दरम्यान शीतल यांच्या कुटुंबीयांनी किडनीदानासाठी अर्ज केलेला होता. ज्या हाॅस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरू होते, त्या हाॅस्पिटल प्रशासनाकडून किडनी डोनर उपलब्ध झाला असून आवश्यक त्या चाचण्यासाठी शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत मुंबईला पोहचण्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानुसार संध्याकाळी शीतल व त्यांचे पती आनंद बोर्डे हे जळगाव विमानतळावर दाखल झाले. मात्र या दरम्यान त्यांचे विमान सुटल्याने ते निराश झाले.

दरम्यान, ही बाब शीतल यांचे बंधू व शहापूरचे सरपंच जितेंद्र पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सांगितली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान मुंबईला जाणार असल्याने मंत्री महाजन यांनी ही बाब उपमुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता महिला रुग्ण व त्यांचे पती या दोघांना आपल्या सोबत घेत मुंबईकडे रवाना झाले. किडनीविकारग्रस्त असलेल्या लाडक्या बहिणीच्या मदतीला उपमुख्यमंत्री धावून आल्याची सुखद घटना यानिमित्ताने समोर आली.

जामनेर तालुक्यातील एक किडनीविकारग्रस्त भगिनीला तातडीने मुंबईत जाणे गरजेचे होते. ही बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर मंत्री गिरीश महाजन यांनी टाकली. त्यांनी या भगिनीला व तिच्या पतीला सोबत मुंबईला नेल्याने तत्काळ उपचार मिळाले.- गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र.

Web Title: Deputy Chief Minister's support for sister suffering from kidney disease; Eknath Shinde took her on a plane for treatment in Mumbai