अमळनेरला बंद घरातून आठ लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:32 PM2021-07-29T16:32:51+5:302021-07-29T16:33:17+5:30

विधवा महिला हळदीच्या कार्यक्रमास गेलेली असताना चोरट्याने चोरी केली.

Amalner was robbed of Rs 8 lakh from a locked house | अमळनेरला बंद घरातून आठ लाखांची घरफोडी

अमळनेरला बंद घरातून आठ लाखांची घरफोडी

googlenewsNext



अमळनेर : घराच्या मागील दरवाज्याचा कडीकोंडा तोडून विधवा महिलेच्या घरातील आठ लाखाचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २८ रोजी रात्री ९ ते १२ वाजेदरम्यान घडली.
रेखा अनिल लांडगे ही महिला २८ रोजी रात्री ९ वाजता घराला कुलूप लावून आपल्या मुलांसह बहादरपूर रोडवरील खळेश्वर कंजरवाड्यात हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास ती परत आल्यावर तिने घराचा दरवाजा उघडला असता तिला घरामागील दरवाजा तुटलेला दिसून आला. तिने घरातील कपाट पाहिल्यावर त्याचे लॉकरही तोडलेले दिसून आले. कपाटातील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६ तोळ्यांचे तीन सोन्याचे नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३ तोळ्यांचे तीन सोन्याचे काप, २४ हजार रुपये किमतीचे ६ ग्राम वजनाचे सोन्याचे टोंगल, ८० हजार रुपये किमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या, ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले किल्लू व बाळ्या, ४० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचे पेंडल व मणी, ७ हजार ५०० रुपये वजनाचे १५ भार वजनाचे चांदीचे पैंजण, ५ हजार रुपयांचा १० भार चांदीचा कंबरेचा पट्टा व कपाटातील २ लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण ७ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला आहे.
घटनास्थळी डीवाय.एस.पी. राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाययक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, दीपक माळी, रवी पाटील यांनी भेट दिली तर श्वानपथक व अंगुली मुद्रापथक पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाचे विनोद चव्हाण यांनी श्वानाला वस्तूंचा गंध दिला तर अंगुली मुद्राचे सहायक पोलीस निरीक्षक जी. के. कांबळे, साहेबराव चौधरी यांनी विविध वस्तू व कपाटावरील ठसे घेतले.
रेखा लांडगे यांचे पती ५ महिन्यांपूर्वीच मयत झाले आहेत. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने श्रावण श्याम संदानशीव व बंटी उर्फ विशाल नाना बिऱ्हाडे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत.

Web Title: Amalner was robbed of Rs 8 lakh from a locked house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.