भरधाव टिप्परच्या धडकेत सहा महिन्यांची गर्भवती महिला पतीसह ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:57 IST2019-05-27T16:50:37+5:302019-05-27T16:57:05+5:30
रुग्णालयातून नियमित तपासण्या करून दोघे घराकडे परतत होते

भरधाव टिप्परच्या धडकेत सहा महिन्यांची गर्भवती महिला पतीसह ठार
जालना : जालना-भोकरदन रोडवरील गुंडेवाडी शिवारात टिप्परने दुचाकीला धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. २७ ) दुपारी घडली. या अपघातात योगेश गणेश बोडखे (२५, रा. जानेफळ ता. भोकरदन) हे जागीच ठार झाले. तर त्यांची गर्भावाटी पत्नी गिता (२०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश बोडखे हे आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नी गिता यांची जालना येथून वैद्यकीय तपासणी करून दुचाकीवरुन (एमएच-२१,एजे- ५०६४) जानेफळकडे जात होते. यावेळी घाणेवाडीकडून जालन्याकडे गाळ घेऊन येणाऱ्या भरधाव टिप्परने (एमएच-१८, एम-५०२३) ने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर टिप्पर जवळच्या कारखान्याच्या भिंतीवर जाऊन धडकला. अपघातात दुचाकी चालक योगेश हे जागीच ठार झाले आहे. गंभीर जखमी अवस्थेत गीतावर जालना येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबादला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी टिप्पर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो दारूच्या नशेत असल्याचे समजते.अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी अनिल काळे, भरत कडूळे, कृष्णा भडंगे यांनी जखमींना दवाखान्यात नेले.