क्यू चिंता करते हो साहब... सब अच्छा और ठिक हो जाएगा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:54+5:302021-02-09T04:33:54+5:30

किशोर अग्रवाल यांची रूपम स्टील असो की, त्यांचे घर हे एक सर्व पक्षीय नेत्यांसाठीची हमखास बैठक होती. विशेषकरून भाजप ...

Q worry sir ... everything will be fine and okay .... | क्यू चिंता करते हो साहब... सब अच्छा और ठिक हो जाएगा....

क्यू चिंता करते हो साहब... सब अच्छा और ठिक हो जाएगा....

किशोर अग्रवाल यांची रूपम स्टील असो की, त्यांचे घर हे एक सर्व पक्षीय नेत्यांसाठीची हमखास बैठक होती. विशेषकरून भाजप आणि शिवसेनेसाठी तर ही जागा जवळपास निश्चतच असे. भाजपचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि किशोर अग्रवाल यांची मैत्री सर्वश्रूत आहे. निवडणुका कोणत्याही असोत, किशोर अग्रवाल यांच्या एमआयडीसीत त्यांची चर्चा आणि त्यावर खलबते न झाल्यास नवल. आपल्या कंपनीत येणाऱ्या प्रत्येकाचे ते अत्यंत हसतमुखाने स्वागत करत, चहा, नाष्टा केल्याशिवाय त्यांच्या केबिनमधून जाणे शक्य नसे. जालना पालिका, जालना बाजार समिती, जालना लोकसभा, जालना विधानसभा अशा कुठल्याच निवडणुका नसतील की, ज्या अग्रवाल यांच्या सोबत आणि त्यांच्या कार्यालयात डावपेच ठरले नाहीत.

राजकीय क्षेत्रात त्यांची जशी भाजपशी जवळीक होती. तशीच ती काँग्रेसचे नेते आणि आ. कैलास गोरंट्याल यांच्या साेबतही होती. माजी आ. अरविंद चव्हाण असोत, दिवंगत खा. अंकुशराव टोपे, तसेच त्यांचे पुत्र आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी देखील किशोर अग्रवाल यांची तेवढीच घट्ट मैत्री होती. त्यामुळे ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व होते. निवडणुकीच्या काळात नेत्यांचे फोन बंद असल्याने अनेकजण अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून माग काढत.

रूपम स्टीलच्या माध्यमातून त्यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती. यावेळी त्यांनी ती रोवूनच थांबले नाहीत, तर उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासह अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी ते नेत्यांना भाग पाडत. साहब इतना तो करनाही पडता... असे म्हणून ते कितीही गंभीर मुद्दा असला तरी तो ते अत्यंत साधेपणाने आणि अलगद सोडवून घेत. पुन्हा त्याचा त्यांनी कधी बडेजावपणा केला नाही. उद्योगासोबतच त्यांनी जालन्यातील अग्रसेन फाऊंडेशनची उभारणी असो की, गणेश फेस्टीवल असो, त्यात ते हिरीरीने सहभाग घेत असत. मराठवाडा आंतरप्रिनर्स संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातही आपली एक वेगळी छबी निर्माण केली होती.

भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची अत्यंत जवळीक होती. त्यांच्या या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक गोरगरिबांना शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत केली. त्यांचा परिवार मोठा आहे. परंतु सर्व परिवाराला एका धाग्यात बांधून त्यांनी तीदेखील जबाबदारी पार पाडली.

Web Title: Q worry sir ... everything will be fine and okay ....