मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 07:23 AM2024-01-21T07:23:16+5:302024-01-21T07:23:58+5:30

शेकडो वाहनांचा ताफा, हजारो स्वयंसेवक, कार्यकर्त्यांसह जरांगे-पाटील यांचे प्रस्थान; २६ पासून उपोषण

Manoj Jarange-Patil has left for Mumbai with a fleet of hundreds of vehicles and thousands of his volunteers and activists | मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण

मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण

अंतरवाली सराटी/जालना/वडीगोद्री : मराठा आरक्षण आंदोलनाचे वादळ शनिवारी ठरल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आरक्षणाच्या अंतिम लढ्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शेकडो वाहनांचा ताफा आणि आपल्या हजारो स्वयंसेवक, कार्यकर्त्यांसह मुंबईकडे पायी मोर्चाद्वारे कूच केले. २६ जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर 
केला आहे. 

मराठा आरक्षणासाठी चार महिन्यांपूर्वी अंतरवाली सराटी गावातून सुरू झालेला मनोज जरांगे-पाटील यांचा लढा सुरू झाला. ‘लढेंगे और जितेंगे!’ या निर्धारासह त्यांनी मुंबईकडे प्रस्थान ठेवले. सकाळीच गावात असंख्य मराठा युवक, युवतींसह महिलांची गर्दी झाली होती. सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास मनाेज जरांगे-पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गावातील महिलांनी औक्षण करून निरोप दिला. त्यावेळी महिलांसह वयोवृद्धांनाही गहिवरून आले होते. त्यानंतर घोषणा देत पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. मार्गात अनेक ठिकाणी जरांगे-पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

पाच जिल्ह्यांतून जाणार यात्रा
हा  मोर्चा जालना, बीड, अहमदनगर, पुणे, ठाणे या पाच जिल्ह्यांतून जाणार असून, २६ जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. ठिकठिकाणी दुपारी, रात्री जेवण आणि राहण्याची व्यवस्था समाजबांधवांकडून केली आहे.

कोणी उद्रेक केला, तर पोलिसांच्या ताब्यात द्या
आपले आंदोलन शांततेत सुरू आहे आणि सुरू राहणार. रॅलीत कोणी उद्रेक, जाळपोळ केली, तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्या. वाद घालू नका, एकमेकांची काळजी घेऊन रॅलीत सहभागी व्हा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले.

महामार्गांवर अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम
सोलापूर-धुळे, तसेच कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने, नागरिकांचा जनसमुदाय यामुळे वाहतूक संथ होती. ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो, चारचाकी वाहने व दुचाकी या शेकडो वाहनांमुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

ठिकठिकाणी स्वागत
गेवराईतील शिवाजी महाराज चौकात ५१ जेसीबीने दोन टन झेंडूची पुष्पवृष्टी, क्रेनद्वारे मोठा हार घालून जरांगे पाटील व सहभागींचे स्वागत करण्यात आले. गढी येथील माजलगाव चौकात परिसरातील अनेक गावांतील नागरिकांनी स्वागत केले. 

ही टोकाची लढाई, आता माघार नाही
मराठा आरक्षणासाठी ३०० हून अधिक युवकांनी आत्महत्या केली. ४५ वर्षांपासून लढा सुरू आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या तरी सरकार प्रमाणपत्र देत नाही. ज्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं, ज्यांचा एकुलता एक मुलगा हातचा गेला, त्यांच्या वेदना पाहून डोळ्यांत अश्रू येतात. मी असेन, नसेन. आंदोलन थांबू देऊ नका. आता ही टोकाची लढाई आहे. शासनासमवेत बोलणी सुरूच राहतील; मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. - मनोज जरांगे-पाटील, आंदोलनकर्ते

Web Title: Manoj Jarange-Patil has left for Mumbai with a fleet of hundreds of vehicles and thousands of his volunteers and activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.