पाण्यासाठी परतूर पालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:35 IST2019-07-26T00:35:02+5:302019-07-26T00:35:21+5:30
नागसेननगर येथील रहिवाशांनी गुरूवारी पाण्यासाठी नगर पालिकेवर हंंडामोर्चा काढला.

पाण्यासाठी परतूर पालिकेवर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहरातील नागसेननगर येथील रहिवाशांनी गुरूवारी पाण्यासाठी नगर पालिकेवर हंंडामोर्चा काढला. पाणी मिळेपर्यंत आंदोलन मागे घणार नसल्याचा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला होता. शेवटी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतले.
परतूर येथील रेल्वे गेटबाहेरील नागसेननगर येथील रहिवाशांनी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना केला. आता पावसाळा सुरू असूनही टंचाई कायम आहे. पाण्यामुळे हाल होत असल्याने संतप्त नागरिकांनी हातात हंडे घेऊन गुरूवारी सकाळी थेट नगरपालिका गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत आमच्या भागात पाण्याची सोय केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला. पालिका कर्मचाऱ्यांनाही आत जाण्यास मज्जाव केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान, पाईपलाईन दुरूस्तीची कामे होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन उपनगराध्यक्ष अय्युब कुरेशी, अंकुश तेलगड, राजेश भुजबळ, बाबूराव हिवाळे यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी न. प. अधीक्षक भगवान चव्हाण, पाणीपुरवठा विभाग प्रमुख अतुल देशपांडे, अजीज सौदागर आदींची उपस्थिती होती.