रोगराईमुळे राजूर परिसरातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:22+5:302021-01-10T04:23:22+5:30

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूरसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह धुके दाटून येत आहे. त्यामुळे या भागातील रबी ...

Farmers in Rajur area are worried due to the disease | रोगराईमुळे राजूर परिसरातील शेतकरी हवालदिल

रोगराईमुळे राजूर परिसरातील शेतकरी हवालदिल

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूरसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह धुके दाटून येत आहे. त्यामुळे या भागातील रबी हंगामातील फुलोऱ्यात असलेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असून, पिकांना मोठा फटका बसत आहे. खरिपापाठोपाठ रबी हंगामही वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यावर्षी पावसाळ्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांची वाट लागली. कपाशी, मका, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. राजूर परिसरात यावर्षी रब्बीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके तजेलदार असताना अचानक गेल्या आठ दिवसांपासून ढग दाटून येत असून, धुके पडत असल्याने फुलोऱ्यातील पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या गव्हाला थंडीची गरज असताना धुके पडत आहेत. त्यामुळे पिके वाया जाण्याची भीती बळावली आहे. तसेच दूषित वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला असून, आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. यावर्षी आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. परंतु, तो गळून पडत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरात गेल्या दोन वर्षांपासून फळबाग लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. धुक्यामुळे द्राक्ष बागाही धोक्यात असून, धुक्यामुळे फुलोऱ्यात असलेली ज्वारी काळी पडत आहे. रब्बीची पिके ऐन भरात असताना दूषित वातावरणामुळे ती वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.

Web Title: Farmers in Rajur area are worried due to the disease