'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:29 IST2025-11-19T19:26:45+5:302025-11-19T19:29:10+5:30
थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत पोलीस संरक्षणासाठी केलेला अर्ज परत

'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
वडीगोद्री (जालना): "माझ्या घातपाताचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारालाच सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत असेल, तर मला अशा सरकारचे पोलीस संरक्षण नको!" अशा अत्यंत कठोर शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. जरांगे यांनी बुधवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी अर्ज देऊन जालना पोलीस अधीक्षकांकडे आपले पोलीस संरक्षण तात्काळ काढण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांवर जरांगे अजूनही ठाम आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. "माझ्या घातपाताचा कट रचणारा धनंजय मुंडेच आहे. या कटाच्या मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत आहे."
त्यांनी पुढे म्हटले आहे, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना पूर्ण ताकतीने वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला दिलेले पोलीस संरक्षण नको, ते तात्काळ काढावे." जरांगे पाटील यांचे सहकारी किशोर मरकड यांनी बुधवारी सायंकाळी हा मागणीचा अर्ज पोलीस अधीक्षकांना दिला.