डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानेवर लाल डाग कसला?, फोटो व्हायरल; तब्येतीबाबत डॉक्टरांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 08:35 IST2026-03-05T08:35:18+5:302026-03-05T08:35:50+5:30
एप्रिल २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालात मोमेटासोन क्रीमचा वापर केल्याचा उल्लेख होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानेवर लाल डाग कसला?, फोटो व्हायरल; तब्येतीबाबत डॉक्टरांनी केला खुलासा
वॉश्गिंटन - अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानेवर लालसर रंगाच्या खुणांमुळे फोटोग्राफर आणि माध्यमांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावरही याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या खुणा एका सामान्य स्किन क्रिमच्या वापरामुळे झाल्या आहेत असं व्हाईट हाऊसमधील डॉक्टरांनी सांगितले. त्वचेवरील उपचारासाठी ही क्रीम लावण्यात आली आहे. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये मेडल ऑफ ऑनर समारंभावेळी घेतलेल्या ट्रम्प यांच्या मानेवर उजव्या बाजूला, त्यांच्या कॉलरच्यावरील बाजूस एक लाल डाग दिसला होता. यामुळे ७९ वर्षीय राष्ट्रपती ट्रम्प यांच्या प्रकृतीवर प्रश्न उभे राहिले.
एक आठवडा चालणार उपचार
कार्यक्रमावेळी जारी केलेल्या निवेदनात व्हाईट हाऊसचे डॉक्टर सीन बार्बाबेला म्हणाले की, हा लालसरपणा त्वचेच्या सामान्य उपचारांशी संबंधित आहे. राष्ट्रपती ट्रम्प त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूला एक सामान्य क्रीम वापरत आहेत, जी डॉक्टरांनी खबरदारी म्हणून लिहून दिली आहे. हा उपचार फक्त एक आठवडा चालणार आहे. परंतु क्रीममुळे लालसर डाग काही आठवडे दिसू शकतात असं त्यांनी सांगितले. तर व्हाईट हाऊसने ही क्रीम कोणत्या आजाराशी निगडित आहे याबद्दल अधिक माहिती दिली नाही. डॉक्टरांच्या माहितीशिवाय माझ्याकडेही याबद्दल अधिक माहिती नाही असं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनीही म्हटले.
मेडिकल रिपोर्टमध्येही त्वचेच्या उपचारांचाही उल्लेख
असोसिएटेड प्रेसच्या मते, एप्रिल २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालात मोमेटासोन क्रीमचा वापर केल्याचा उल्लेख होता. ही एक स्थानिक स्टिरॉइड क्रीम आहे जी सामान्यतः त्वचेची जळजळ किंवा सूज यावर उपचार करण्यासाठी लिहून दिली जाते. डॉक्टर बार्बाबेला यांनी याआधी अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत आहे असं सांगितले आहे. गेल्या वर्षी वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये केलेल्या तपासणीनंतर ट्रम्प यांचे हृदय आणि पोटाचे स्कॅन पूर्णपणे सामान्य असल्याचे आढळून आले अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
प्रकृतीबाबत अनेकदा चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपतीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात बऱ्याचदा त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा होत राहते. विशेषत: त्यांचे वाढते वय यावर बोलले जाते. जानेवारीत शपथ घेतल्यानंतर अमेरिकन इतिहासात सर्वात जास्त वयाचे ते राष्ट्रपती बनले आहेत. कधी कधी त्यांच्या हातांवर खुणा, पायात सूज यासारखी लक्षणे दिसतात. ट्रम्प यांनी यापूर्वी हातावरील खुणांमुळे नियमित अॅस्पिरिनच्या वापरामुळे असल्याचे सांगितले होते. तर ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस इन्सफीशियन्सी नावाचा एक सामान्य आजार आहे, जो वयानुसार अनेक लोकांमध्ये दिसून येतो.