पाकिस्तान-अफगाणिस्तानात युद्ध, संयुक्त राष्ट्राचा इशारा; अफगाण सैन्यानं पाकचं एअरक्राफ्ट पाडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 08:15 IST2026-02-27T08:14:20+5:302026-02-27T08:15:00+5:30
तालिबानी प्रवक्त्यांनीही पाकिस्तानच्या हल्ल्याची पुष्टी केली. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशाराही अफगाणिस्तानच्या सरकारने दिला.

पाकिस्तान-अफगाणिस्तानात युद्ध, संयुक्त राष्ट्राचा इशारा; अफगाण सैन्यानं पाकचं एअरक्राफ्ट पाडलं
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या काबुल, कंधार आणि पक्तिया या भागात एअरस्ट्राईक केले. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेत घुसून हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबानने गुरुवारी रात्री आक्रमक उत्तर दिले. अफगाणी सैन्याने पाकिस्तानच्या सीमेवरील चौक्यांना टार्गेट केले. त्यानंतर काही तासांत पाकिस्ताननेही पलटवार केला. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या सैन्य मुख्यालयासह अनेक तळांवर हल्ले सुरू केले आहेत.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानी हल्ल्याची माहिती दिली आहे. २६ फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या क्षेत्रांवर हल्ले केले. ज्यात महिला आणि लहान मुलांचा जीव गेला. अफगाणी सैन्याने पक्तिया, खोस्त, नंगरहार, कुनार आणि नूरिस्तानसारख्या भागात पाकिस्तानी हल्ल्याला उत्तर देत पाकच्या सैन्याला मागे ढकलले. पाकिस्तानी एअरक्राफ्टही पाडले आहे. या लढाईत २ सैन्य तळ, १९ पोस्ट ताब्यात घेण्यात आले आहे आणि ४ पोस्टवरून पाकिस्तानी सैनिक फरार झाले आहेत असं सांगण्यात आले. तर या दोन्ही देशांमधील वाढत्या संघर्षामुळे कतारच्या मध्यस्थीने होणाऱ्या युद्धविरामच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे. त्याशिवाय जागतिक पातळीवरही चिंता पसरली आहे.
'Open War' ची घोषणा
पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तान तालिबानीविरोधात ओपन वॉरची घोषणा केली आहे. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या लष्करी तळांना टार्गेट केले आहे. काबुल, पक्तिया आणि कंधार भागात हवाई हल्ले सुरू आहेत. काबुलमध्ये जवळपास २ तास लढाऊ विमानांचा आवाज येत होता. त्याशिवाय जोरदार स्फोट, गोळीबारीही ऐकायला येत होती. तालिबानी प्रवक्त्यांनीही पाकिस्तानच्या हल्ल्याची पुष्टी केली. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशाराही अफगाणिस्तानच्या सरकारने दिला.
संयुक्त राष्ट्राचा इशारा
दरम्यान, तालिबान आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षाबद्दल संयुक्त राष्ट्राने तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि या परिस्थितीमुळे प्रादेशिक अस्थिरतेची भीती व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही बाजूंना पुढील लष्करी संघर्ष टाळण्याचे आणि चर्चेद्वारे आपसांतील मतभेद सोडवण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय या वाढत्या तणावांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कारण सतत संघर्षाचे व्यापक प्रादेशिक परिणाम होऊ शकतात.