भारतातून निघालेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा पाण्याखालून भीषण हल्ला; ८० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 20:42 IST2026-03-04T20:37:02+5:302026-03-04T20:42:26+5:30

अमेरिकन पाणबुडीने उडवली इराणची युद्धनौका; हिंदी महासागरात ८० जणांचा मृत्यू

US Submarine Sinks Iranian Warship Returning from India At Least 80 Dead | भारतातून निघालेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा पाण्याखालून भीषण हल्ला; ८० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

भारतातून निघालेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा पाण्याखालून भीषण हल्ला; ८० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

IRIS Dena: हिंदी महासागरात श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या एका अण्वस्त्रसज्ज पाणबुडीने इराणची युद्धनौका आयआरआयएस देना ही टॉर्पेडोचा हल्ला करुन बुडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात किमान ८० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, दुसऱ्या महायुद्धानंतर एखाद्या शत्रू राष्ट्राची युद्धनौका टॉर्पेडोने बुडवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही युद्धनौका काही दिवसांपूर्वीच भारतात सरावासाठी आली होती.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पिट हेगसेथ यांनी या हल्ल्याची पुष्टी दिली. "आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या इराणच्या युद्धनौकेला आमच्या पाणबुडीने जलसमाधी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या युनिटच्या म्होरक्याला काल कंठस्नान घालण्यात आले. इराणने ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, पण अखेर विजय आमचाच झाला आहे," असे हेगसेथ यांनी सांगितले.

श्रीलंकेकडून बचावकार्य सुरु

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, इराणची माऊज-क्लास फ्रिगेट आयआरआयएस देना ही युद्धनौका बुडाली. श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपासून ४० नॉटिकल मैल दूर आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात हा हल्ला झाला. या जहाजावर सुमारे १८० नौसैनिक होते. श्रीलंकन नौदलाने आतापर्यंत ३२ जणांना सुखरूप वाचवले असून अनेकांचे मृतदेह हाती लागले आहेत. जखमींवर गाले इथल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतातील युद्धअभ्यासाहून परतताना हल्ला

विशेष म्हणजे, ही इराणी युद्धनौका भारतात आयोजित इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू २०२६ आणि मिलन २०२६ या नौदल सरावात सहभागी होऊन परतत होती. विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाने या जहाजाचे जंगी स्वागत केले होते. १८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान बंगालच्या उपसागरात झालेल्या सरावानंतर ही नौका परतीच्या प्रवासाला निघाली होती.

श्रीलंकेची भूमिका आणि तणाव

सुरुवातीला श्रीलंकन नौदलाने तांत्रिक बिघाडामुळे जहाज बुडाल्याची शक्यता वर्तवली होती, मात्र अमेरिकेच्या अधिकृत कबुलीने चित्र स्पष्ट झाले आहे. श्रीलंकेच्या हवाई दलाला आणि नौदलाला घटनेच्या वेळी परिसरात इतर कोणतेही जहाज किंवा विमान दिसले नव्हते, कारण हा हल्ला पाणबुडीद्वारे पाण्याखालून करण्यात आला होता.

युद्धाचा नवा भडका?

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता हिंदी महासागरापर्यंत आणि भारताच्या सीमेपर्यंत पोहोचल्याचे या घटनेवरून दिसत आहे. अमेरिकेने थेट इराणी युद्धनौका बुडवल्यामुळे आता इराणकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हिंदी महासागरात वाढलेला हा तणाव जागतिक शांततेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Web Title : ईरानी युद्धपोत पर अमेरिकी पनडुब्बी का हमला: 80 की मौत, कई लापता

Web Summary : श्रीलंका के पास एक अमेरिकी पनडुब्बी ने ईरानी युद्धपोत आईआरआईएस देना को टारपीडो से डुबो दिया। हमले में अस्सी लोगों की मौत की आशंका है। अमेरिका का दावा है कि द्वितीय विश्व युद्ध के बाद यह पहली घटना है। युद्धपोत भारत में नौसेना अभ्यास से लौट रहा था।

Web Title : US submarine attack on Iranian warship: 80 dead, many missing

Web Summary : An American submarine torpedoed an Iranian warship, the IRIS Dena, near Sri Lanka. Eighty are feared dead after the attack. The US claims it's the first such sinking since WWII. The warship was returning from naval exercises in India.